नागपूर : सिंगापूरसह काही देशात करोनाचे रुग्ण वाढत असतांनाच महाराष्ट्रातही हे रुग्ण वाढू लागले आहे. दरम्यान नागपुरातही करोनाचा धोका वाढत असून दोन नवीन रुग्ण आढळले. यासोबतच शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.करोनाच्या कठीन काळात महाराष्ट्रातील या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या भागात नागपूरचेही नाव वरच्या क्रमांकावरच आहे. तर नागपुरात या आजाराचे मृत्यूही मोठ्या संख्येने झाले होते. त्यानंतर करोना नियंत्रणात आल्यावर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असतांनाच नागपुरात पून्हा या आजाराचे दोन मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे
दरम्यान नागपुरात दगावलेले दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी एक रुग्ण नागपूर तर दुसरा रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. नागपुरातील रुग्णाला क्षयरोगासह इतरही सहआजार होते. तर चंद्रपूरच्या रुग्णाला मूत्रपिंडाचा सहआजार होता. या दोन मृत्यूमुळे नागपुरात यंदा प्रथमच करोनाचे मृत्यू नोंदवले गेले आहेत.
महापालिकेच्या नोंदीनुसार, नागपुरात १ जानेवारी ते ३ जून २०२५ पर्यंतच्या काळात करोनाचे एकूण १७ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी चार सक्रिय रुग्णांवर सध्या विविध रुग्णालय वा गृह विलगिकरणात उपचार सुरू आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला असून इतर सगळे व्यक्ती बरे झाले आहेत.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे काय?
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार शहर हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. दगावलेला रुग्णांना सहआजार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे करोनाला घाबरण्याची गरज नाही. करोनाचे एकही लक्षण दिसताच संबंधित रुग्णाची तपासणी करून तातडीने जवळच्या शासकीय वा खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा, संबंधित रुग्णाने विलगीकरणात राहावे, जेणेकरून आजार नियंत्रणात राहील, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
करोना म्हणजे काय ?
करोना हा विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. विषाणूची लागण झालेल्या बहुतेक लोकांना सौम्य ते मध्यम श्वसन आजाराचा अनुभव येईल आणि विशेष उपचारांची आवश्यकता न पडता ते बरे होतील. तथापि, काही गंभीर आजारी पडतील आणि त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल.
करोनाचे लक्षणे काय ?
करोनाच्या रुग्णांना ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे यापैकी एक वा त्याहून जास्तही लक्षणे असू शकतात.