अकोला : मध्य रेल्वे मार्गावर अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान काही भागात रुळाखालील ‘स्लीपर’ला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुळाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी कड्या देखील निखळून पडल्या आहेत. रेल्वेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्याची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसून मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वे रुळाच्या खालील भागात ‘स्लीपर’ असतात. ते रुळांना आधार देण्यासाठी आणि योग्य अंतरावर ठेवण्यासाठी वापरले जातात. रेल्वे रुळाखाली पसरलेली दगडांच्या थरामुळे स्लीपरला स्थिर ठेऊन पाण्याच्या निचरा होण्यास मदत होते. ‘स्लीपर’मुळे रुळांची स्थिरता वाढून रेल्वेगाड्या सुरक्षितपणे चालू शकतात. ‘स्लीपर’ सिमेंटचे बनलेले असतात. दरम्यान, मध्य रेल्वेच्या अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान रेल्वे मार्गावरील रुळाखालील काही ‘स्लीपर’ला तडे गेल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे.

‘स्लीपर’ला तडे गेल्यामुळे त्याला लावलेल्या लोखंडी कड्या देखील काही ठिकाणी निखळून पडल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात समाज माध्यमावर छायाचित्र व चित्रफित प्रसारित झाली. या धक्कादायक प्रकारामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मध्य रेल्वेचा हा सर्वात व्यस्त मार्ग आहे. या मार्गावरून काही मिनिटांच्या अंतरावर गाड्या वेगाने धावतात. अकोला ते मूर्तिजापूरदरम्यान ‘स्लीपर’ला तडे गेल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली. मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे मार्गाची नियमितपणे तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये ‘स्लीपर’ क्षतिग्रस्त किंवा लोखंडी कड्या निघाल्याचे कुठेही आढळले नाही. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी दिली.

पावसाचा परिणाम?

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील ‘स्लीपर’वर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अगोदर देखील मूर्तिजापूर जवळच जबर पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला होता. गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मूर्तिजापूरजळव रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत होऊन अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या होत्या. विविध रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले होते, तर काही गाड्या रद्द देखील केल्या होत्या. या प्रकाराचा प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला होता.