यवतमाळ: मुलगी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद एका पित्यासाठी औटघटकेचा ठरला. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून वडिलांचे निधन झाले. ही दुर्दैवी घटना महागाव तालुक्यातील वागद इजारा या गावात घडली. प्रल्हाद खंदारे असे मृत वडिलांचे नाव आहे.

पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहिनी खंदारे हिने ८४४ वा क्रमांक घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. मुलीच्या परिश्रम आणि आई-वडिलांचे आशीर्वाद फळास आले. मोहिनीने वागद इजारा या छोट्या गावाला देशपातळीवर लौकीक मिळवून दिल्याने गावकरी, मित्र, नातेवाईक यांनी मोहिनीसह प्रल्हाद खंदारे यांच्या अभिनंदनासाठी तिच्या घरी गर्दी केली.

कुटुंबीयांनीही गावात पेढे वाटून आपल्या मुलीच्या यशाचा आनंद साजरा केला. गावकऱ्यांनीही गावात फलक लावून मोहिनीचे अभिनंदन केले. मोहिनीच्या यशात तिचे वडील प्रल्हाद यांचा सिंहाचा वाटा आहे. स्वत: शिक्षक राहिले असल्याने ते शिक्षणाचे महत्त्व जाणून होते. मुलीने शिकून प्रशासकीय सेवेत जावे, यासाठी त्यांनी मोहिनीच्या शालेय जीवनापासूनच तिला मार्गदर्शन केले. त्यांना पदोन्नती मिळून तेही पुसद पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी झाले.

मोहिनीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नुकत्याच आलेल्या निकालात तिला देशातून ८४४ वी रँक मिळाली. तिच्या परिश्रमाचे चीज झाल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर झळकत होता. मुलीच्या यशानिमित्त त्यांना अनेकांचे फोन आले. त्या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून ते युपीएससी परीक्षेसाठी मोहिनीने किती मेहनत घेतली, हे प्रत्येकास आनंदाने सांगत होते.

या आनंदाच्या भरात मोहिनीचे वडील प्रल्हाद यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मुलीची प्रशासकीय सेवेत निवड झाल्याचा आनंद वडिलांना फार काळ घेता आला नसल्याने कुटुंबीय, नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
प्रल्हाद खंदारे हे वागद इजारा गावात आणि परिसरात मामा म्हणून परिचित हाते.

सेवानिवृत्तीनंतर ते गावात वास्तव्यास होते. शिक्षक असताना त्यांनी अनेक मुलांना घडविले. गावातील अनेक सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा कायमच पुढाकार असायचा. मुलगी प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर गावासाठी खूप काही करण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या निधनाने गावकऱ्यांसह त्यांचे विद्यार्थी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.