नागपूर : प्रत्येक समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आंदोलने केली जात असताना कुठे हिंसा होणार नाही, दोन समाज समोरासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता त्या-त्या समाजातील नेत्यांनी आणि आंदोलन करणाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असताना जालनामधील वडीगोद्री येथे दोन्ही समाज एकमेकासंमोर उभे ठाकले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, प्रत्येक समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलन करताना दोन समाजात तेढ आणि हिंसा होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला असून सर्व अधिकारी लक्ष ठेवून आहेत. मात्र दोन्ही समाजाच्या नेत्यांनी आंदोलन भडकू नये याची दक्षता घेतली पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> परिवहन आयुक्तांशी आरटीओ संघटनेची चर्चा निष्‍फळ; २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप अटळ

धारावीमध्ये मशीदीचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक पोहचले होते. या संदर्भात न्यायालयाचे निर्णय आहे. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात गेल्यावेळेला न्यायालयाने सांगितले होते. तेव्हाही मुंबई महापालिकाने कारवाई सुरू केली होती. त्यावेळी विरोध झाला तेव्हा त्यांच्याकडून अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल. आज देखील मुंबई महापालिकेचे पथक त्या ठिकाणी गेले होती. त्यावेळी त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले आहे की पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो.. त्यामुळे पथक परत गेले आहे.. कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था (लॉ ॲन्ड ऑर्डरची) परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आता कुठलाही त्या ठिकाणी तणाव नाही. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे त्यांनी (मशीद कमिटीने) मुंबई महापालिकेला लिहून दिले आहे. त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>> Sakoli Constituency : साकोली मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गड राखणार? की भाजपा बाजी मारणार?

तिसऱ्या आघाडीबाबत काय म्हणाले फडणवीस?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिसरी आघाडी तयार होत असताना आमदार बच्चु कडू यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य केले आहे, त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, तिसरी आघाडी तयार झाली असेल. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल. त्याप्रमाणे त्यांनी जर आमचा मुख्यमंत्री होईल असे सांगितले असेल तर त्यात काय वावगं काय आहे, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis share opinion on protest for reservation with media vmb 67 zws