लोकसत्‍ता टीम

अमरावती : जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांची संथगती सुरूच आहे. ६६६ मंजूर योजनांपैकी केवळ २७७ कामेच पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे, पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे.

केंद्रसरकारच्या माध्यमातून घरोघरी नळ पाणी पुरवठा यावा यासाठी जल जीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि शुध्द मुबलक पाणी पुरवठा घरोघरी व्हावा हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे. प्रतिमाणसी किमान ५५ लिटर पाणी नागरीकांना उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कंत्राटदारांची अकार्यक्षमता, तांत्रिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई या कारणामुळे योजनेअंतर्गत मंजूर कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-अकोला :‘मविआ’मुळेच हवाईसेवेच्या ‘टेकऑफ’ला ‘ब्रेक’, खासदार अनुप धोत्रेंचा आरोप

जिल्ह्यात अतिशय संथपणे या योजनेची कामे सुरू असून मंजूर झालेल्या ६६६ पैकी केवळ २७७ योजनाच पूर्णत्वास गेल्या. अन्य कामे प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ज्या मेळघाटात योजनेची सर्वाधिक कामे झाल्याचा दावा केला जात असताना मेळघाटातील १६ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येत्‍या सप्‍टेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्‍याचे शासनाचे आदेश आहेत. या योजनांवर सुमारे २६२.८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कामांची संख्‍या पाहता मुदतीत ही कामे पूर्ण होणे अशक्‍य मानले जात आहे.

पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाईचे चटके

जिल्‍ह्यात मोसमी पावसाचे आगमन होऊन आठवडा उलटलेला असताना पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. जिल्‍ह्यात सध्‍या १७ गावांमध्‍ये टँकरच्‍या साहाय्याने पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यात येत आहे.

सद्य:स्थितीत ९४ गावांची तहान अधिग्रहित केलेल्या ४१ बोअर व खासगी ६८ विहिरींवर भागविली जात आहे. गेल्‍या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस झाल्‍याने जमिनीत जलपुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे मार्च पश्चात सर्व तालुक्यातील भूजलात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक गावांमधील जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना कुचकामी ठरल्या आहे. त्यातच पाणीटंचाई निवारणार्थ योजना आचारसंहितेत रखडल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यावर तात्पुरत्या उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे देण्यात आली आहे.

आणखी वाचा-नागपूरः मध्य भारतात त्वचापेढी नसल्याने जळालेल्या रुग्णांचे हाल

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार अमरावती तालुक्यात १०, नांदगाव खंडेश्वर १७, मोर्शी १४, धारणी १०, चिखलदरा १९, तिवसा ७, भातकुली १, चांदूर रेल्वे ३, धामणगाव रेल्वे २ व अचलपूर तालुक्यात ३ गावांमध्ये अधिग्रहण केलेल्या ६८ विहिरी व ४१ बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

चिखलदरा तालुक्यात १६ टँकर सुरू

जिल्ह्यात सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात सुरू आहेत. यामध्ये खडीमल गावात ४, आलाडोह २, बेला, मोथा, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौरखेडा बाजार, लवादा, गवळी ढाणा, स्कूल ढाणा व कालापेंढरी गावात प्रत्येकी एक टँकर सुरू आहेत. याशिवाय चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मग्रापूर येथे १ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.