नागपुर: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे. त्यांना मध्यरात्री १२:३० नंतर नागपुरात आणण्यात आले. या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन दिवसांपूर्वी निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे दोषी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने वाघमारे यांना पुढील कारवाई होईपर्यंत निलंबित केले. त्यानंतर आता उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आल्याने आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy director of education ulhas narad arrested given approval for principal based on bogus documents dag 87 zws