राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, अशाप्रकारची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. या टीकेनंतर आता भाजपाकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेवरून शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये अंबाझरी तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या टीकेबाबत विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, शरद पवार आणि महाविकास आघाडी सध्या नकारात्मक मानसिकतेत आहेत, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.

हेही वाचा – “पोर्श कार अपघात प्रकरणातील गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न”; पोलीस आयुक्तांनी सांगितली धक्कादायक माहिती

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“शरद पवार किंवा विरोधीपक्ष असतील, ही लोक सध्या एका नकारात्मक मानसिकतेत आहेत. कारण या दुष्काळात निवडणूक सुरू असतानाही प्रशासनाने त्यांच्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडल्या आहेत. दुष्काळी भागात टॅंकर पुरवणापासून ते इतर अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अजूनही महिनाभर या उपाययोजना सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने बैठका घेणं सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भातील बैठक घेतली आहे. त्यामुळे सरकार गंभीरपणे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं हे शरद पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच शरद पवार यांच्या काही सुचना असतील, तर त्या सुचना त्यांनी द्याव्यात, त्याचा विचार आम्ही करू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Pune Porsche Accident: “महाविकास आघाडी पोर्श कार अपघात प्रकरणी जाणीवपूर्वक..”,फडणवीसांचं वक्तव्य

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, “आज शरद पवार यांनी मंत्र्यांच्या दुष्काळासंदर्भातील बैठकीला गैरहजर राहण्यावरून सरकारला लक्ष्य केलं होतं. कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला तेसुद्धा हजर नव्हते. यावरून दुष्काळाकडे मंत्री किती गांभीर्याने बघतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला दुष्काळाचं राजकारण करायचं नाही. मात्र, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने बघावं. या पद्धतीचे दुर्लक्ष तुमच्या सहकाऱ्याकडून होत असेल तर याची दखल घ्यावी”, अशी टीका त्यांनी केली होती.