नागपूर: दीवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, हा सण फक्त दिवे, फटाके आणि सजावटीपुरताच मर्यादित नाही, तर विविध स्वादिष्ट पदार्थांसह प्रेम आणि आनंद वाटण्याचा सण आहे. मिठाई, तळलेले पदार्थ आणि स्वादिष्ट जेवण हे या सणाचा महत्त्वाचा भाग आहेत. पण या उत्साहात जास्त खाल्ल्यामुळे अपचन, आम्लतासह इतरही धोके बळावतात. त्याबाबत आहार तज्ज्ज्ञांचे निरीक्षण आपण जाणून घेऊ या.

दिवाळीसह इतरही सणासुदीच्या खाण्यात लाडू किंवा समोसा खाणे सोडून द्यायचा नाही, फक्त ते योग्य प्रमाणात खाण्याची गरज आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात खाल्ल्याने तुम्ही सणातील सर्व गोड आणि स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकता आणि तुमचं आरोग्यही टिकवू शकते. दिवाळीत तळलेले पदार्थ टाळा. डीप- फ्रायड स्नॅक्सच्या ऐवजी बेक केलेली मठरी, खाकरे किंवा भाजलेला चिवडा खाने ठिक आहे. बेक केलेल्या समोश्याचा स्वाद तोच असतो, फक्त तेल कमी असते.

दिवाळीत आरोग्यदायी मिठाई निवडा. ती निवडतांना साखरेच्या मिठाई ऐवजी गूळ, खजूर, अंजीर आणि सुका मेवा पासून बनवलेली मिठाई खा. बदाम, अक्रोड, जवस आणि भोपळ्याच्या बिया यांचा समावेश करा. हे स्वाद आणि पोषण दोन्ही वाढवतात. दिवाळीच्या काळात भरपूर पाणी आणि हर्बल टी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो. सॅलड, फळे, उसळ (स्प्राऊट्स ) आणि हलके जेवण ताटात असू द्या. जेणेकरून सणाचा आनंद घेताना संतुलन टिकेल. तुमचे ताट रंगोळीप्रमाणे रंगीबेरंगी आणि पोषक बनवा. दिवाळीच्या पार्टीत गेट- टुगेदरमध्ये गप्पा मारताना किंवा टीव्ही पाहताना जास्त खाल्ले जाते. त्यामुळे बसून, हळूहळू आणि प्रत्येक घासाचा आनंद घेत खाण्याचा सराव करा. याने पचन सुधारते आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो, अशी माहिती नागपुरातील व्होकार्ट रुग्णालयातील आहार तज्ज्ज्ञ स्वाती अवस्थी यांनी दिली.

नित्याने व्यायाम आवश्यक…

सणात व्यायामाला विसरू नका. सकाळी चालणे, हलके योगासन किंवा सणाच्या वेळी नाचणे या गोष्टींमुळे ऊर्जाआणि फिटनेस टिकून राहते. त्यामुळे दीवाळी अधिक उत्साही आणि आनंददायी होते.

आरोग्यदायी भेटवस्तूंची परंपरा गरजेची

दीवाळीत नवीन परंपरा सुरू करा. त्यानुसार मिठाईच्या डब्यांच्या ऐवजी सुका मेवा, हर्बल टी किंवा औषधी वनस्पतींची झाडे भेट द्या. ही अशी भेट असेल जी आरोग्य आणि आनंद दोन्ही देईल.