अमरावती : दिवाळी म्हटलं की रोषणाई, नवीन कपड्यांसह फराळाचे पदार्थ आणि मिठाई हे समीकरण ठरलेलेच. पण, यंदा अमरावतीकरांच्या दिवाळीच्या गोडव्याला सोन्याची झळाळी मिळाली आहे. कारण, येथील एका प्रतिष्ठित मिठाई व्यावसायिकाने बाजारात आणली आहे, तब्बल २१ हजार रुपये प्रति किलो किमतीची ‘गोल्डन फ्लॉवर’ नावाची खास मिठाई. या मिठाईवर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेला असल्याने तिची चर्चा केवळ अमरावतीतच नाही, तर मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने रघुवीर प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी ही अनोखी मिठाई तयार केली आहे. बदाम, पिस्ता आणि केशर यांचा वापर करून तयार होणाऱ्या या मिठाईवर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो. त्यामुळेच तिची किंमत सामान्य मिठायांच्या तुलनेत खूप जास्त आहे. सोन्याच्या किमती गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम मिठाईच्या किमतीवरही झाला आहे. गेल्या वर्षी सोन्याचा वर्ख लावलेल्या मिठाईची किंमत ही १४ हजार रुपये प्रति किलो होती.

पोपट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोल्डन फ्लॉवर’ ही मिठाई तयार करण्यासाठी राजस्थानातील विशेष कारागीर बोलावले जातात. मुंबई, पुणे येथूनही या मिठाईची मागणी आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ही मिठाई अमेरिकेलाही पाठवण्यात आली होती. ‘गोल्डन फ्लॉवर’ला लॅबकडून प्रमाणित करण्यात आले आहे. मात्र, यंदा सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांचा उत्साह थोडा कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

५८ वर्षांची परंपरा

रघुवीर प्रतिष्ठान गेल्या ५८ वर्षांपासून कार्यरत आहे, तर ३५ वर्षांपासून ते मिठाई व्यवसायात आहेत. देशभरातून कुशल कारागीर बोलावून येथे बंगाली आणि उत्तर भारतीय मिठायांची देखील निर्मिती केली जाते.या मिठाईत सुवर्ण भस्म असल्याने ती आरोग्यासाठीही चांगली मानली जाते. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या मिठाईची आम्हाला आतुरता असते. २१ हजार रुपये हा केवळ एक आकडा आहे. पण, वर्षातून एकदाच मिळणारी ही मिठाई आमच्यासाठी खूप खास असते, असे ग्राहकांनी सांगितले.

गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये प्रति किलो दराची ‘सोनेरी भोग’ नावाची मिठाई बाजारात आणली होती. यात किमान एक ग्रॅम सोन्याचा वर्ख वापरल्याचा दावा करण्यात आला होती, ज्याची किंमत गेल्या वर्षी १० हजार ५०० रुपये होती. पण सोन्याचे दर महागल्याने यंदा सोन्याचा वर्ख लावलेल्या मिठाईचा दर चांगलाच वाढला आहे.