नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या वतीने शुक्रवारी वनामती सभागृहात पार पडला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर व ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी उपस्थित होते. गडकरी हे त्यांचे आयुष्यात आलेले अनेक प्रसंग इतरांना सांगायला प्राधान्य देतात. अमिताभ बच्चन, बिल गेट्स, अंबानी असे अनेकांचे किस्से गाजलेले आहे. मात्र यावेळी नितीन गडकरी यांनी दुबईचे राजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते स्वतः जेवायला गेले असतानाच एक अनोखा किस्सा सांगितला.

आणि दुबईच्या राजांनी मोदींना विनंती केली की…

नितीन गडकरी हे त्यांच्या कामासाठी फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी देशात आजवर लाखो कोटींची काम केलेली आहे. त्यामुळे त्यांना रोडकरी असेही बोलले जाते. गडकरी यांचा स्वभाव आणि त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा यामुळे ते सर्वांनाच हवेसे वाटतात. याचाच प्रत्यय दुबईच्या राजांसोबत गडकरींना स्वतःला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि दुबईचे राजे हैदराबाद हाऊस मध्ये जेवायला बसले असताना चक्क दुबईच्या राजांनी मोदींना एक अनोखी मागणी केली. ते म्हणाले की, पुढच्या सहा महिन्यांसाठी गडकरींना आमच्याकडे निर्यात करून द्या. यावेळी तिघांमध्ये हसा पिकला होता. हा प्रसंग गडकरी यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान सांगितला.

संघाच्या त्यागामुळे मंत्री बनलो- गडकरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन लाखो कुटुंबे जोडली. स्वयंसेवकांच्या त्याग आणि तपस्तेतून आज आमच्यासारख्याला काहीतरी मिळाले. त्यांना काहीच मिळाले नाही. तरी ते आनंदी आहेत. आमच्यासारखे लोक मंत्री बनतात त्यातच ते आनंदी होतात. झेंडा घेऊन उभे होतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विरोधकांचेही माझ्यावर प्रेम

मानवी नातेसंबंध ही तुमची शक्ती आहे. संघाच्या संस्कारातून कार्यकर्ते निर्माण झाले. सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणाकरिता काम करणे हे संस्कार संघातून मिळत गेले. त्यामुळे मी जे विचार मांडतो त्याची मला भीती वाटत नाही. आज केरळचे मुख्यमंत्री माझ्यावर जेवढे प्रेम करतात तेवढेच ममता बॅनर्जीही करतात, असेही गडकरी म्हणाले.

राजकारण्यांच्या विकासाची प्रक्रिया खंडित? – घळसासी

आज अक्षरशत्रू असणे हिच राजकारणातील पात्रता ठरली आहे का, अशी भीती वाटायला लागली आहे. हातावर मोजता ऐतील एवढेच नेते साहित्य, कलेची जाणिव असणारे आहेत. विकास होईल, रस्ते होतील, उद्योगही होतील. परंतु, हे ज्यांच्या हातून होईल त्यांच्याच विकासाची प्रक्रिया खंडित तर झाली नाही ना, याचाही विचार करावा लागेल, असे परखड मत विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

पुस्तक लेखनात शैलेश पांडेंचे योगदान

पुस्तक प्रकाशन दरम्यान अनेक मान्यवरांचा राजहंस प्रकाशनतर्फे सत्कार करण्यात आला. गडकरींनी पुस्तक कसे लिहिले याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की मी संघाविषयी असलेली माहिती, अनेक किस्से सांगत गेलो आणि जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी ते रेकॉर्ड करून घेतले आणि शब्दबद्ध केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच हे पुस्तक तयार करून होऊ शकले असे गडकरी म्हणाले.