गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्‍या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर देवरी तालुक्यातील बाघ नदी पात्रात शिरपूर मध्ये अडकलेल्या दोन जण सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे शिरपूरबांध येथील गंगा देशलाहरे (५३) , हरी देशलाहरे (४५) दोघे रा. खैरागड ( छत्तीसगड) , अनिल सुरजभान बागडे रा. शिरपूरबांध ता. देवरी या तिघांना बाहेर काढण्यात आले तर शिरपूर बांध जवळील रस्ता ओलांडताना पेट्रोलचा टॅंकर वाहून गेला. गोंदिया शहारासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले. घरात पाणी शिरले, साहित्यांची प्रचंड नासाडी झाली. गोरेगाव येथे सुध्दा घऱामध्ये पाणी शिरले आहे.

९५ गावांना सतर्कतेचा इशारा

गोंदिया जिल्ह्य़ातील पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे नदी काठालगतच्या ९५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नदीनाल्यांना पूर आल्याने काही मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे.

हे ही वाचा… संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी करणे का टाळले ?

रूग्णालयात पाणी शिरले

शहरातील राणी अवंतीबाई चौकात ३ फूट पाणी रस्त्यावरुन वाहत होते. शहरातील गंगाबाई महीला शासकीय रूग्णालयात व खाजगी सहयोग रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णालयाचे व रुग्णांचे हाल झाले.

अनेक वस्त्या जलमय हनुमान नगर, अयोध्या नगर, गजानन कालोनी, इंद्रप्रस्थ कालोनी, न्यू लक्ष्मी नगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाल्याचे दृश्य होते. शहरातील मुख्य बसस्थानकात साचलेले पाणी बाहेर काढण्याकरीता बसस्थानकाची सुरक्षा भिंत फोडल्याने ते पाणी मागच्या भागातील घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील हनुमान नगर, अयोध्या नगर, गजानन कालोनी, इंद्रप्रस्थ कालोनी, न्यू लक्ष्मी नगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाला.

हे ही वाचा… बारमध्ये वाद : नागपूर भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पुत्राने केले होते आत्मसमर्पण

हे मार्ग बंद

जिल्हयातील घोनाडी नाल्यावरील चिचगड ते नवेगावबांध मार्ग, पळसगाव ते तुमडीमेंढा,खजरी ते डव्वा,परसोडी ते ककोडी,मोहगाव ते गडेगाव,गोरेगाव ते कालीमाटी,कामठा ते आमगाव,फुलचूर ते मोहगाव बु.,तिरोडा-गोंदिया आदी रस्ते बंद पडले आहेत.