यवतमाळ: गेल्या चार वर्षांपासून  प्रशासक राज अनुभवणाऱ्या जनतेला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील १० नगर पालिका आणि एका नगर पंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली. मात्र उमेदवारांना प्रचारासाठी पूर्ण आठवडाही मिळणार नसल्याने, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, आर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, नेर-नबाबपूर आणि पांढरकवडा या १० नगरपालिकांमध्ये आणि ढाणकी नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम १७ नोव्हेंबर आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रचार साहित्याद्वारे उमेदवारांना प्रचार सुरू करता येईल.

चार वर्षांनंतर निवडणूक होत असताना निवडणूक प्रचारासाठी अवघे पाच ते नऊ दिवस मिळणार असल्याने उमेदवारांना धडकी भरली आहे. शहरातील प्रभाग मोठे असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. २ डिसेंबरला मतदान असल्याने ३० नोव्हेंबर रोजी पाच वाजता जाहीर प्रचार बंद होईल. जे उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून प्रभागात सक्रिय आहेत, ज्यांना नागरिक ओळखतात अशाच उमेदवारांना निवडणूक प्रचार जरा सोईचा आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून जे नवखे उमेदवार रिंगणात उतरणार आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

राजकीय पक्षांची परीक्षा

यावेळी शून्य आरक्षणामुळे राजकीय पक्षांचीही गैरसोय झाली आहे. जे इच्छुक निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी करत होते, त्यांच्या स्वप्नांवर आरक्षणामुळे पाणी फेरले आहे. त्यामुळे ऐनवेळी तगड्या उमेदवाराची शोधाशोध करण्यासाठी राजकीय पक्षांची तारांबळ सुरू आहे. त्यातच निवडणूक अचानक घोषित झाल्याने, अल्पावधीत सर्व सोपस्कार पूर्ण करायचे असल्याने राजकीय पक्षांचीही परीक्षा असल्याची चर्चा आहे.