लोकसत्ता टीम

अकोला : पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त होण्यास विलंब झाल्याने वेतन थांबले. साडेपाच हजारावर कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अमरावतीसह राज्यातील दोन विभागात ही अडचण आल्याची माहिती आहे.

उच्च शिक्षण विभागांतर्गत शासन अनुदानित विविध शाखांच्या वरिष्ठ महाविद्यालय येतात. सोबतच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा देखील समावेश आहे. या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अमरावती विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन उच्च शिक्षण विभागाच्या अमरावती येथील सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालयामार्फत होते. अमरावती विभागात दीडशेच्यावर महाविद्यालयांमध्ये पाच हजारांवर, तर अमरावती विद्यापीठात सुमारे ५०० कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा गेल्यानंतरही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन रखडले आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने हे वेतन रखडल्याचे सांगण्यात येत आहे. काही तांत्रिक समस्या देखील आल्याची माहिती आहे. राज्यात अमरावतीसह दोन विभागात ही अडचण आली. वेतनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

आणखी वाचा-‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…

मार्च महिन्याचे वेतन दरवर्षीच विलंबाने

उच्च शिक्षण विभागामध्ये दरवर्षीच मार्च महिन्याचे वेतन विलंबाने होत असते. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने ही अडचण येते. यावर्षी फेब्रुवारी महिन्याचे देखील वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे..

शासनाकडून अनुदान न मिळाल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या वेतनास विलंब झाला. आता दोन्ही महिन्यांचे अनुदान प्राप्त आले आहे. त्याची सूचना प्राचार्यांना देखील देण्यात आली. वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे. येत्या एक ते दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल. -डॉ. सुबोध भांडारकर, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती.