बुलढाणा : चोहोबाजूंनी अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. बुलढाण्यापाठोपाठ आज संग्रामपूरमध्येही एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह कृषी प्रधान जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संग्रामपूर तहसील कार्यालयात आज हा खळबळजनक घटनाक्रम घडला. दत्ता इंगळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते तालुक्यातील निवणा गावचे रहिवासी आहे. आज या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने संग्रामपूर तहसीलदारांचे दालन गाठले व अचानक अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखल्याने संभाव्य भीषण घटना टळली.
हेही वाचा – मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर, २० मार्ग बंद, वाहतूक खोळंबली
हेही वाचा – वर्धा : सर्पदंशाने मृत्यू! मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे
यानंतर तहसीलदारांच्या कक्षात बसल्यावर इंगळे अक्षरशः ढसाढसा रडले. मोठ्याने आकांत करीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नासाडीची माहिती दिली. शेताच झालेलं नुकसान पहाणीसाठी अधिकारी, लोक प्रतिनिधी न आल्याने त्यांचात निर्माण झालेला रोष असा व्यक्त झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला हे उघड झाले. काल जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाण्यात एका शेतकऱ्याने जिल्हा कचेरी परिसरात विष प्राशन केले. अन्य शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.