चंद्रपूर: वाढते कर्ज, नापिकी आणि सततच्या आर्थिक विवंचनेने त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड (६८) या शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नाईकनगर, चंदनवाही, ता. राजूरा येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा राठोड आपल्या दोन्ही मुलं व त्यांच्या कुटुंबियांसोबत नाईकनगर, चंदनवाही येथे राहत होत्या. चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक, गडचांदूर शाखेचे त्यांचेवर गत काही वर्षापासून कर्ज होते. बँकेकडून वारंवार कर्ज वसुलीचा तगादा लावला जात होता. बँकेचे कर्मचारी वेळोवेळी घरावर येत असल्याने त्यांच्यावर मानसिक तणाव वाढला होता. याशिवाय, शेतीसाठी त्यांनी सावकारी कर्जदेखील घेतले होते. त्यांच्या दोन्ही मुलांनीही शेतीसाठी कर्ज घेतल्याने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक ओझं वाढलं होतं. मागील वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने शेतीतून काहीच उत्पन्न होत नव्हते. या वर्षी कपाशीचे पीक घेतले होते, मात्र अतिवृष्टीमुळे तेही पूर्णपणे नापिकी ठरले.
सततचे नुकसान, वाढते कर्ज आणि बँक व सावकारांकडून होणारा दबाव -या सर्व आर्थिक ओझ्याने यशोदा राठोड मानसिकदृष्ट्या खचल्या. अखेर या असह्य तणावाला कंटाळून त्यांनी बुधवारी दुपारी घरातच गळफास घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच राजूरा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजूरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने संपूर्ण नाईकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
