अकोला : नैसर्गिक संकटाशी तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेने देखील थट्टाच चालवली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. या योजनेतून बळीराजाला मदत करण्याऐवजी त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ५, ८, १० रुपये अशी अतिशय तुटपुंजी मदत दिली. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे ती रक्कम परत केली. या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटाची नुकसान भरपाई दिली जात आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर चक्क पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा झाली. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही केवळ थट्टा असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. ही तुटपुंजी मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला परत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिनोडा, मरोडा, कावसा आणि रेल या गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई म्हणून ५ ते २७ रुपये जमा झाले.

काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे पैसे परत केले आहेत. कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई म्हणून ५ रुपये, ८ रुपये, १३ रुपये, १५ रुपये, २१ रुपये अशा पद्धतीचे पैसे आले आहेत. अरुण राऊत यांच्या खात्यात ५ रुपये ८ पैसे, संदीप घुगे यांना ५ रुपये, गणपत सांगळे यांना १३ रुपये, विजय केंद्रे यांना १४ रुपये ७ पैसे, केशव केंद्रे यांना १६ रुपये १५ पैसे, आदित्य मुरकुटे यांना २१ रुपये ८५ पैसे आणि उमेश कराड यांच्या खात्यावर २७ रुपये ५ पैसे अशी मदत जमा झाली. ही मदत शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच असून यातून एक पाव साखर सुद्धा मिळू शकत नाही. अशी मदत पाठवून सरकार शेतकऱ्यांचा अपमान करीत आहे, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.