अमरावती : प्रसिद्धी माध्यमे आणि समाज माध्यमांमध्ये चुकीची बातमी प्रसारीत झाली, तर किती गोंधळ उडतो, याचा प्रत्यक्ष अनुभव माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांना आज सकाळीच आला. त्यांच्या निधनाची चुकीची बातमी एका स्थानिक वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामुळे वसुधाताई देशमुख यांनाही मोठा धक्का बसला. अनेक हितचिंतकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
वसुधाताई देशमुख यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत केला आहे. त्यात त्यांनी आपण सकुशल असल्याचे म्हटले आहे. माझ्या निधनाची बातमी कुणी दिली, हे मला माहित नाही, पण वृत्तपत्रात चुकीची बातमी आली की, अनेकांची मने दुखावली जातात. हितचिंतक अस्वस्थ होतात. कुठल्याही बातमीची शहानिशा करायला हवी. शहानिशा केल्याशिवाय अशा प्रकारच्या संवेदनशील बातम्या प्रसारीत करणे गैर आहे, अशा शब्दात वसुधाताई देशमुख यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. या चुकीच्या बातमीमुळे वसुधाताई यांच्या निकटवर्तीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. स्वत: वसुधाताई यांना समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारीत करून आपण सकुशल असल्याचे सांगावे लागले.
आज पहाटेच समाज माध्यमांवर वसुधाताई देशमुख यांच्या निधनाची बातमी प्रसारीत झाली. त्यांच्या हितचिंतकांसाठी हा फार मोठा धक्का होता. अनेकांनी वसुधाताई यांच्या येथील कॅम्प परिसरातील निवासस्थानी धाव घेतली. त्या सकुशल असल्याचे कळल्यानंतर हितचिंतकांनी, समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
समाज माध्यमांवर अनेकांनी श्रद्धांजलीचे संदेश धाडले. नंतर त्यांनाच त्याचे खंडन करावे लागले. वसुधाताई देशमुख यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना या लोकांनी नंतर केली. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात या चुकीच्या बातमीने चांगलीच खळबळ उडवून दिली होती.
वसुधाताई देशमुख यांच्या निधनाची बातमी काही प्रसार माध्यमांनी देखील कुठलीही शहानिशा न करता प्रसारीत केल्याने त्यांच्या हितचिंतकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाज माध्यमांवर अनेकांना खुलासा करावा लागला. खुद्द माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख यांनी निधनाचे वृत्त चुकीचे असल्याचे समाज माध्यमांवर स्पष्ट केले.
वसुधाताई देशमुख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) प्रदेश उपाध्यक्षा आहेत. यांनी दीर्घकाळ अचलपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्या श्रमसाफल्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत आणि कृषी विज्ञान केंद्रासारख्या संस्थांच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान विकासावर काम करीत आहेत.
