वर्धा : राजकारण विरहित काही नाती असतात. ती जोपासणारे पण काहीच नेते असतात. वयाची ८९ वर्ष. याच वयात दोन गंभीर शस्त्रक्रिया. डॉक्टर व कुटुंबियांची घराबाहेर पडण्यास मनाई. मात्र तरीही राजकीय गुरुस भेटण्यास सर्व बंधने बाजूला सारत माजी खासदार दत्ता मेघे हे नागपुरातून वर्ध्यात आले आहे. सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यास शरद पवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

दुपारी चार वाजता यशवंत महाविद्यालयच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजन समितीत दत्ता मेघे पण आहेत. मात्र शरद पवार यांची येण्याची खात्री झाल्यावर मेघे यांनीही तब्येतीची तमा नं बाळगता या कार्यक्रमास हजेरी लावण्याचा निर्धार केला. शुक्रवारी रात्री ते सावंगी येथील निवासस्थानी पोहचले. यावेळी खास लोकसत्ताशी संवाद साधतांना ते म्हणाले की तब्येत ठीक नाही, हे खरं. पण प्रथमच तब्बल दहा वर्षानंतर शरद पवार सोबत जाहीर कार्यक्रमात बसण्याचा योग येतोय. मग ही संधी सोडणार कशी, असा प्रश्न ते करतात. २०१४ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर असे पवारांसोबत जाहीरपणे एकत्र बसणे झाले नाही. मात्र जेव्हाही पवार नागपुरात आले, तेव्हा माझी त्यांची खाजगी भेट झालीच, असे मेघे सांगतात.

हेही वाचा…Video : आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक; मुलाचा वाढदिवस जल्लोषात

आज ते आणि मी एकत्रित संबोधणार, ही संधीच होय असे म्हणत मग जुन्या आठवणीत रमतात. त्यांच्याच दिल्लीतल्या घरात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यापूर्वी १९७८ मध्ये साधा आमदार नसूनही पवारांनी राज्यात मंत्री केले. तीन वेळा विधान परिषदेचे आमदार केले. लोकसभेचा खासदार झालो. पुढे राज्यसभेचा खासदार म्हणून संधी मिळाली. वर्ध्यात राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून पडलो. पण तरीही राज्यात मंत्री बनलो. हे सर्व शरद पवार यांच्याच कृपेने, अशी भावना ते व्यक्त करतात. व आपल्या याही वयात शाबूत असलेल्या तल्लख स्मरणशक्तीचा परिचय देतात. कार्यक्रमात भाषण करणार असल्याचे म्हणत ते जाड अक्षरात टाईप करुन ठेवलेले भाषण दाखवितात. सत्कारमूर्ती सुरेश देशमुख यांनी केलेल्या कार्याचा आढावा मांडलाच पाहिजे, असे मेघे सांगतात.