नागपूर : शासकीय जमिनीवर अंबाझरी उद्यान विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून येथे प्रत्येकी २० हजार चौरस फूट जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क आणि छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्यात येत आहे. असामाजिक घटकांचा अड्डा बनलेला हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने, तसेच सामाजिक भान ठेवून विकसित करण्यात येत आहे. मात्र, काही लोक या प्रकल्पाबद्दल गैरसमज परसवत आहेत. या प्रकल्पाबद्दल कोणाचे काही गैरसमज असतील तर समोरासमोर बसून त्यावर तोडगा काढता येणे शक्य आहे, अशी भूमिका गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा. लिमिटेडचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ता कार्यालयाला जिचकार यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांनी अंबाझरी तलावालगतच्या उद्यानाच्या विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरदेखील भाष्य केले. आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर प्रकल्प उभा राहण्यासाठी व्हावे. ते थांबवण्यासाठी नको, याकडेही जिचकार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, या प्रकल्पाला विरोध नेमका कशासाठी होत आहे हे कळायला मार्ग नाही. ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पण, कुठेच असे नमूद नाही. ज्यावेळी ही जमीन महापालिकेकडे होती त्यावेळी अविनाश दोसटवार यांनी उद्यानाची देखभाल-दुरुस्ती केली. त्यानंतर चंद्रपाल चौकसे यांच्याकडे काही दिवस जबाबदारी होती. त्यांना कदाचित परवडले नसेल. नंतर ही जागा नझुलकडे गेली. नझुलने एमटीडीसीकडे जमीन हस्तांतरित केली. त्यांनी हे उद्यान विकसित करण्याचे ठरवले. या प्रकल्पाअंतर्गत अंबाझरी उद्यान थीम पार्कमध्ये रुपांतरित करण्याचे बंधनकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक्झिबिशेन सेंटर उभारण्यात येत आहे. एम्पिथिएटर हे प्रकल्प हाती घेतल्यापासून या बाबींचा त्यात समावेश आहे, असेही जिचकार यांनी सांगितले.

हेही वाचा – भंडारा: शंकरपटात बैलजोडी झाली सैराट, अन्…; जगत गुरुजींच्या बैलजोडीचा व्हिडिओ व्हायरल

प्रकल्प नेमका कसा?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा. लि. या कंपनीला अंबाझरी उद्यान विकसित करण्यासाठी दिले आहे. हा प्रकल्प ४२.५ एकरवर असून ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आला आहे. या प्रकल्पात फूड प्लाझा, अम्युझमेंट पार्क, छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क अँड म्युझियम, ॲम्पिथिएटर, योगा-मेडिटेशन झोन, मिनिएचर सिटी, स्पोर्ट्स थिम पार्क, वॉटर स्पोर्ट, मत्सालय, लेक व्ह्यू रेस्टॉरेंट, म्युझिकल फाउंटेन, नागपूर हाट, हँडिक्राफ्ट बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन राहणार आहे.

२० हजार चौरस फूट जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क, तसेच छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क प्रत्येकी २० हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित समाज भवनाचे बांधकाम आठ हजार चौरस फूट जागेवर होणार आहे. हे दोन मजली भवन पूर्वीप्रमाणेच अनुदानित दरामध्ये उपलब्ध होणार आहे. येथे विकसित करण्यात येणारे ग्रंथालय, स्टडी सर्कल, रिडिंग रूम, म्युझिक ॲकेडमी नि:शुल्क असेल, असेही जिचकार म्हणाले.

हेही वाचा – “सरकार तुमचेच, जुनी पेन्शन तत्काळ लागू करा”; आमदार अडबाले यांचे राज्य सरकारला आवाहन

सर्व काही नियमानेच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी २० एकर जागा आरक्षित होती, याची नोंद शासकीय कागदपत्रात असायला हवी. आंदोलन करणाऱ्यांच्या किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे ते होऊ शकत नाही. शासनाने नझुलची जमीन एमटीडीसीला दिली आणि त्यांनी ती विकसित करण्यासाठी गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा. लि.ला दिली. यासाठी दोनदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यासाठी कोणीही पुढे आले नाही. सर्व काही नियमाने होत आहे. नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारा हा चांगला प्रकल्प आहे, असा दावाही जिचकार यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foundation lay program of ambazari udyan development project soon inform garuda amusement park pvt limited director narendra jichkar rbt 74 ssb