गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशाच परिस्थितीत नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात एका जिल्हा परिषद मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
वसंत सोमा तलांडी (४४), रा. जोनावाही, ता. भामरागड असे मृत मुख्याध्यापकाचे नाव असून ते पेरमिली जवळील पल्ले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होते. १८ ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ते आपल्या मूळ गावी जोनावाहीकडे सिपनपल्ली मार्गे परतत असताना सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाला ओलांडताना वाहून गेले.
या घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने संबंधित शिक्षकाच्या नातेवाइकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह वसंत सोमा तलांडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
या दुर्घटनेमुळे मंडळातील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ही भामरागड तालुक्यातील दुसरी अशी घटना असून याच दिवशी कोडपे येथील १९ वर्षीय तरुण लालचंद कपिलसाय लकडा खंडी नाला ओलांडताना वाहून गेला होता. शिक्षक वसंत तलांडी यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पल्ले शाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भामरागडमधील पूरस्थिती कायम, सिरोंचा परिसराला धोक्याचा इशारा
जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने भामरागड शहर पाण्याखाली गेले होते. काही घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने खाली करावी लागली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम असून पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी अद्याप संपर्क तुटलेला आहे.
दुसरीकडे तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पातील येलमपल्ली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने शिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची एक समूह देखील पाठविली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ११ मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नद्या व नाल्यांच्या काठावर राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल व पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.