यवतमाळ : नवरात्री उत्सवात आता गरबा, दांडिया नृत्यास अनन्यसाधारण महत्व आले आहे. मात्र, या रास दांडियावर उच्चभ्रु आणि विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असल्याचे अनेक ठिकाणी जाणवते. आता तर विशिष्ट समाजाला दांडिया नृत्यात प्रवेश देवू नये, असे फर्मानही काही संघटनांनी काढले आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळात सर्व जाती, धर्मातील कष्टकरी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला गरबा, दांडिया उत्सव दखलपात्र ठरला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारात गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळात हा कष्टकरी महिलांचा दांडिया दुर्गोत्सवात रंगत आणत आहे.

आज सर्वत्र गरबा उत्सव हा व्यावसायिक उपक्रम झाला असताना अशा व्यावसायिक उत्सवात गोरगरीब आणि सर्वसामान्य वर्गातील महिला व मुली महागडे प्रवेश शुल्क देऊन सहभागी होऊ शकत नाही. अशा सर्व कष्टकरी, दुर्लक्षित, गोरगरीब वंचितांच्या मुली, महिलांना गरबा नृत्यामध्ये सहभागी होता यावे व त्याचा आनंद लुटता यावा यासाठी डॉ. नीरज वाघमारे यांनी गरबा स्पर्धा सुरू केली. स्पर्धेच्या पाच दिवस अगोदर सर्व सहभागी तरूणी, महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धेत विनामूल्य प्रवेश देऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील दिली जातात.

या उपक्रमांतर्गत शनिवारी रात्री स्थानिक संभाजी नगरमधील पीपल्स कॉलेजमध्ये गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले. खुला गट आणि १४ वर्षाखालील अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. या गरबा स्पर्धेत प्रथम बक्षीस सोन्याची नथणी खुशी शेळके यांनी पटकाविले. द्वितीय बक्षीस पैठणी साक्षी गायकवाड यांनी तर तृतीय बक्षीस मोत्याचा हार समृद्धी वाटकर यांनी पटकाविले. प्रोत्साहनपर बक्षीस अमृता घाडगे आणि राणी हातागळे यांना मिळाले.

१४ वर्षाखालील गटात प्रथम सोन्याची नथणी चार्वी निकोडे हिने, द्वितीय बक्षीस पैठणी धनश्री तांगडे तर तृतीय बक्षीस मोत्याचा हार नंदिनी डोनलकर हिने पटकाविले. प्रोत्साहनपर बक्षीस अनया हातागडे आणि शिमर नाडे यांनी पटकाविले. सर्व विजेत्यांना पारितोषिकास सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कष्टकऱ्यांच्या या गरबा प्रशिक्षण वर्गासाठी प्रशिक्षक म्हणून रचना श्रीखंडे आणि सना भगत यांनी काम पाहिले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन वानखडे आणि स्नेहा हळदे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी गरबा नाईटचे मुख्य आयोजक डॉ.नीरज वाघमारे, शिवदास कांबळे, पुष्पा शिरसाठ आदींसह महिला, तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.