नागपूर: विदर्भाच्या देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे निर्मित गोमय गणेश मूर्तीची सात समुद्रापार देशांमध्ये स्थापना करण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक मूर्तीमध्ये देशी झाडांच्या बिया मिसळल्याने विसर्जनानंतर चार ते पाच दिवसांमध्ये रोपटे उगवते. या आगळ्या- वेगळ्या गणेश मूर्तीबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील देवलापार येथे गो विज्ञान अनुसंधान केंद्र आहे. या केंद्राद्वारे निर्मित गोमय गणेश मूर्तीना नागपूरसह इतरही भागातील गणेश भक्तांकडून मागणी आहे. यंदा या मूर्ती अमेरिकेसह दक्षिण आफ्रिकेतही पाठवण्यात आल्याची माहिती केंद्राकडून दिली गेली. या केंद्राद्वारे २०२४ मध्ये प्रायोगिक तत्वावर फक्त ५० मूर्ती तयार करण्यात आल्या. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी १ हजार १०० मूर्ती तयार केल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले.
पर्यावरण संवर्धन आणि पारंपरिक मूल्यांचा संगम साधणाऱ्या या अभिनव उपक्रमाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायीचे शेण, मुलतानी माती आणि लाकडाच्या भुकटी आधीच्या मिश्रणातून गणेश मूर्ती घडवण्यात आली. ही केवळ मूर्ती नाही तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. या मूर्तीची उंची १२ इंचाची आहे. किंमत १ हजार १०० रूपये आहे. या मूर्तीमध्ये देशी झाडांच्या बिया मिसळण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुंडीत वा मातीत मूर्ती विसर्जन केल्या नंतर चार ते पाच दिवसांनी रोपटे उगवते.
निसर्गपूरक गणशमूर्तीसाठी पर्याय
हल्ली सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये जास्तीत जास्त मोठ्या मूर्ती घेण्याबाबत स्पर्धा दिसते. या मूर्ती सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या उद्भवते. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि विविध रसायनयुक्त पेंट यामुळे प्रदुषण होवून हजारो मूर्तीच्या अर्धवट विसर्जनाने वातावरणही दुषित होते. म्हणून पर्यावरण प्रेमी लोकांनी यावर आक्षेप घेतल्यापासून नागपूरसह इतरत्रही निसर्गपूरक गणेशमूर्तीसाठी पर्याय शोधण्यास सुरूवात झाली. त्यातूनच ‘गोमय गणपती’ची संकल्पना पुढे आल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले.
शेणाचा ८० टक्के वापर…
गायीच्या शेणाचे गणपती करताना अगदी सोपी प्रक्रिया करावी लागते. गोमय पावडर, माती, लाकडी पावडर आणि गौर गम पावडर यांचे मिश्रण केले जाते. तयार लगदा साच्यामधून काढून मूर्ती घडवल्या जातात. यात शेणाचा वापर ८० टक्के असतो. मूर्ती तयार झाल्यावर किंवा घडवताना शेणाचा अजिबात वास वगैरे येत नाही. गोमय पावडर तयार करताना शेणातले पाणी पूर्णपणे काढले जात असल्याचेही केंद्रातर्फे सांगण्यात आले.