नागपूर: नागपूरसह देशभरात नवीन वर्षापासून सातत्याने सोन्याचे दर वाढत असताना प्रथमच आज ( मंगळवारी) ९ तासात घसरण दिसून आली. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावरही सोन्याचे दर वाढतच गेले. दरम्यान नवीन वर्षात मंगळवारी (११ फेब्रुवारी) प्रथमच सोन्याचे दर सकाळी वाढल्यावर संध्याकाळनंतर घसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे दागिने खरेदीसाठी इच्छुक कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूरसह देशभरात करोनानंतर सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मागच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क ६ टक्केपर्यंत कमी केल्याने देशभरात सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र उलट दर वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यातच मंगळवारी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सोन्याचे दर वाढले. परंतु रात्री अनेक दिवसानंतर दरात घसरण नोंदवली गेली.

नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ८६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. परंतु नऊ तासानंतर नागपुरातील सराफा बाजारात ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता वाजता हे दर घसरले. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८५ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६६ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ६०० रुपयापर्यंत खाली आले. त्यामुळे नऊ तासात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३०० रुपयांनी खाली घसरलेले दिसत आहे. दरम्यान सध्या दरात किंचित घट असली तरी आंतराष्ट्रीय घडामोडी बघता सोन्याचे दर येत्या काळात आणखी वाढणार असल्याने सोने- चांदीमध्ये सध्या गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात मंगळवारी (११ फेब्रुवारी २०२५ रोजी) सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता चांदीचे दर ९५ हजार रुपये प्रति किलो होते. हे दर संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घसरून ९४ हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात तब्बल १ हजार रुपये प्रति किलोची घट झालेली दिसत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price down at the end of day todays rate are mnb asj