गोंदिया: दिवाळी सणाच्या नंतर शनिवार २५ व रविवार २६ ऑक्टोबर व पुन्हा गुरुवारी ३० ऑक्टोंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर थैमान घातले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता तर दिवाळी नंतर शेतात कापणी केलेल्या धानपिकात पाणी साचले आहे, तर धानाचे डौलदार उभे पीकही जमीनदोस्त झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात २५ ऑक्टोबर पासून सातत्याने परतीचा पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील शेतकरी कमी कालावधीच्या धानाची कापणी व मळणी करीत आहेत. बुधवारी दुपारी व संध्याकाळो अनेक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी ही पहाटे पासूनच वादळ वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले.
२५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे ७८५ गावांतील ३५ हजार ५७८ शेतकऱ्यांचे १३९५५.४ हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. अंतिम आकडेवारी संपूर्ण पाहणी झाल्यानंतर येईल. धानपीक जोमात असताना तुडतुडा, मावा, करपा रोगाने धानपिकावर आक्रमण केले. कीटनाशकांची फवारीणी करून रोग यश आले. मात्र परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. अधिक कालावधीचे धान परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पाऊस व वादळाच्या फटक्याने भुईसपाट झाले आहे.
काही ठिकाणी कापणी केलेल्या धानाला अंकूर फुटले आहे. बळीराजा पूर्णपणे खचून गेला असून त्याला आर्थिक आधाराची गरज व्यक्त होत आहे.
हातातोंडाशी आलेला घास…
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरात मागील काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपीक निसटले आहे. दिवाळी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी सुरू केलेली होती. पण पावसामुळे कडपा पूर्णतः ओल्याचिंब झाल्या आहेत. काही कडपांना अंकुर फुटले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे धानपीक उभे होते, त्या पिकांना सतत येणाऱ्या पावसामुळे व वादळामुळे फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शासनाने पंचनामे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट
नवेगावबांध परिसरात मध्यरात्रीपासून पुन्हा अवकाळी मुसळधार पावसाला सुरवात झाली असून धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हलक्या धानपिकाची कापणी सध्या सुरू आहे. त्यामुळे धानाच्या कडपा पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे, तर भारी म्हणजे जास्त कालावधीचे धानपीक लोंबा टाकत आहेत. महणजे काही निसव्यावर आहे तर काही निसवले आहे. ते धान पीक मुसळधार पावसामुळे जमिनीवर लोटले आहे. त्यामुळे धान सडण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहिल्या परतीच्या पावसाने झालेल्या करावे व नुकसानभरपाई द्यावी. -सुनील तरोणे, अध्यक्ष, जिल्हा मराठा सेवा संघ गोंदिया.
सडक अर्जुनी तालुक्यात अवकाळी पावसामुळे धान पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे करणे सुरू झाले आहे. -इंद्रायणी गोमासे, तहसीलदार, सडक अर्जुनी.
गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी पडलेला पाऊस….
गुरुवारी जिल्ह्यात सरासरी ९.३ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. गोंदिया तालुक्यात ६.३ मि. मी., आमगाव ७.८ मि. मी, तिरोडा ५.७ मि. मी., गोरेगाव ८.३ मि. मी., सालेकसा ४.५ मि. मी., देवरी ७.८ मि. मी., अर्जुनी मोरगाव २०.९ मि. मी. आणि सडक अर्जुनी तालुक्यात ११ मि. मी. पाऊस नोंदविण्यात आला.
