Gondwana University resolution to name Didolkar hall will be cancelled promise Vice Chancellor ssp 89 ssb 93 | Loksatta

गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला डिडोळकरांचे नाव देण्याचा ठराव रद्द करणार, कुलगुरूंचे आश्वासन; कुलसंगे यांचे उपोषण मागे

ठराव रद्द करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिल्यामुळे दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेले वसंतराव कुलसंगे यांनी उपोषण मागे घेतले आहे.

Didolkar hall Gondwana University
कुलसंगे यांचे उपोषण मागे (image – लोकसत्ता टीम)

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यासंदर्भात अधिसभेत मांडण्यात आलेला ठराव रद्द करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिल्यामुळे दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेले वसंतराव कुलसंगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यासंदर्भात कुलगुरूंनी लेखी आश्वासन देत अधिसूचनादेखील काढल्याने नामकरणाचा वाद संपुष्टात आला आहे.

१७ जानेवारीरोजी गोंडवाना विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यापीठातील सभागृहाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यासंदर्भात ठराव मांडला होता. तो २२ विरुद्ध १२ अशा बहुमताने पारित देखील झाला. मात्र, या निर्णयामुळे जिल्हाभरातील आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळली. परिणामी विविध संघटनांनी विरोध सुरू केला. डिडोळकरांचे नाव रद्द करून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्रांतीकारक, समाजिक योगदान देणारे नेते यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांनी २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

हेही वाचा – गळफास कसा घ्यायचा, काढायचा हे पाहत होता १२ वर्षीय मुलगा, अन्…; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

हेही वाचा – काँग्रेसचाच उमेदवार म्हणतोय, ‘काँग्रेस पक्ष बोगस’; दोन उमेदवारांमधील संवादाची ध्वनीफित प्रसारित

अखेर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी जनभावना लक्षात घेत हा निर्णय रद्द करण्यात येईल, असे जाहीर केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. विद्यापीठाने तसे पत्र काढले असून येत्या अधिसभेत स्वतः कुलगुरू नामकरणाचा ठराव रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहेत. त्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन कुलसंगे यांना निंबूपाणी पाजून उपोषण सोडवले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हीरेखन, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, डॉ. दिलीप बारसागडे, बीआरएसपीचे प्रभारी राज बंसोड, अभारीपचे हंसराज उंदीरवाडे, आदिवासी एम्प्लॉयीज फेडरेशनचे सदानंद आत्राम आदिवासी कर्मचारी संघटनेचे नेते माधवराव गावड, आदिवासी युवा विकास परिषदेचे कुणाल कोवे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 20:26 IST
Next Story
काँग्रेसचाच उमेदवार म्हणतोय, ‘काँग्रेस पक्ष बोगस’; दोन उमेदवारांमधील संवादाची ध्वनीफित प्रसारित