अमरावती : सरकारने शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था न केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांना मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, केवळ तलवार चालवलेली दिसत नाही. सरकारने तीस हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून बनवाबनवी चालवलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे मुर्खात काढत असतील, तर त्यांना भोगावे लागेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, दिवाळी तर बाजूलाच राहिली, शेतकऱ्यांचे आयुष्यच अंधारात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते, की आम्ही शेतकऱ्यांना एकरी पाच ते सात हजार रुपये मदत देणार आहोत. या अपुऱ्या मदतीत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होईल, असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. शेतकऱ्यांनी रब्बीसाठी शेत चांगले करायचे, की पेरणीची व्यवस्था करायची. आता शेतकऱ्यांनी काय करावे. तुमची दिवाळी दोन लाख रुपयांचे फटाके फोडून साजरी करता आणि शेतकऱ्याची दिवाळी पाच हजारात साजरी होऊ शकेल का, हा खरा सवाल आहे. सरकारला याविषयी थोडी लाज वाटायला हवी, पण असली तर वाटेल, अशी टीका त्यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले, अजूनही महाराष्ट्रात सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू झाली नाही. मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात का नाही, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे तीन हजार रुपये इतक्या कमी भावाने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायचा का. याविषयी सत्तारूढ पक्षांतील कुणीही गंभीर नाही. आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी आनंदात आहेत. दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेत आहेत. एकाही जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे पाचशे रुपये क्विंटल भावाने सोयाबीन विकावे लागत आहे, एवढी वाईट अवस्था आहे. कापसाचीही हीच स्थिती आहे.
कापूस खरेदी केंद्र देखील सुरू झालेली नाहीत. पंजाबमधील शेतकऱ्यांचा ९० टक्के शेतमाल हा हमीभावाने खरेदी होतो. आमचा ६ टक्केही होत नाही. येत्या २२ पर्यंत खरेदी केंद्र सुरू केले नाहीत, तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयात गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही, कार्यालय फोडून टाकू, पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. कर्जमाफी योग्यवेळी देऊ असे मुख्यमंत्री म्हणतात. पण, हमीभावाचे काय, हा त्यांना आपला प्रश्न आहे. शेतमालाचे दर हमीभावापेक्षा खूप कमी आहेत. त्याविषयी ते बोलत नाहीत, असे बच्चू कडू म्हणाले.