वर्धा : जिल्ह्यात भाजपचे चार आमदार व एक मंत्री. तर महाआघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचा फक्त एकच एक खासदार. मात्र या खासदार अमर काळे यांनी भाजपवर टीका करण्याची किंवा केंद्र व राज्य शासनावर आसूढ ओढण्याची एकही संधी सोडली नाही. जिथे सार्वजनिक भाषणाची संधी असेल तिथे खासदार काळे टिकेचे प्रहार करत असतात. एव्हडेच नव्हे तर संसदेत त्यांनी केलेली भाषणे पंतप्रधान मोदी व अन्य मंत्र्यांना लक्ष्य करणारी असल्याचे सार्वजनिक झाले आहे. त्यांना प्रत्युत्तर भाजप किंवा महायुतीचे कोणीच देत नाही. मात्र आता हा विडा पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी उचलल्याचे दिसून येत आहे.

व्यासपीठ भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेचे. त्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी खासदार अमर काळे यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले की काय परिस्थिती आहे बघा. जो व्यक्ती अनेकदा आमदार राहला. त्यास स्वतःच्या घरापुढील रस्ता सुद्धा बांधता आला नाही. ज्याचा लोकसभा क्षेत्रात सोडाच, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात संपर्क नव्हता त्यास खासदार खासदार म्हणून लोकांनी निवडून दिले. तर जो व्यक्ती १० वर्षात पायाला भिंगरी लावून फिरला त्यास पाडण्यात आले, असे डॉ. भोयर म्हणाले. अमर काळे या विद्यमान खासदाराशी त्यांनी माजी खासदार रामदास तडस यांच्याशी तुलना केली व तडस यांच्या पराभवबद्दल खंत व्यक्त केली. १० वर्षात जिल्ह्यात ७०० किलोमीटरवर राष्ट्रीय महामार्गचे जाळे विणण्याचे श्रेय तडस यांना देत डॉ. भोयर यांनी त्यावेळी थोडे गाफिल राहल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच पुढील काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गाफिल नं राहता काम करा, असे आवाहन त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले.

खासदार अमर काळे व पालकमंत्री डॉ. भोयर यांचे खुले राजकीय वैर लोकांना परिचित झाले आहे. यापूर्वी हिंगणघाटच्या सभेत बोलतांना जिल्हा नियोजन मंडळात खासदाराची कामे व त्यासाठी निधी नामंजूर केल्या जात आहेत, असा आरोप खा. काळे यांनी केला होता. पण कुठवर हे चालणार, पैसा तो देणाही पडेगा, असा आक्रमक सूर काळे यांनी काढला होता. तसेच निधी मिळत नसेल तर आंदोलन करणार, असा ईशाराही देऊन टाकला होता. याचे चांगलेच पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्धेतील पत्रकार परिषदेत या निधी वाटपबाबत सदर प्रतिनिधिने त्यांना प्रश्न केला. तेव्हा अजितदादा आक्रमकपणे उत्तरले. ते म्हणाले की खासदारचा अधिकार तो काय. त्यांचा अधिकार केंद्राच्या निधीबाबत बोलण्याचा. जिल्हा समिती असते खासदार अध्यक्षतेत. त्यात त्यांनी बोलावे. जिल्हा नियोजन मंडळ हे राज्याच्या विकास कामासाठी असते. आमदार व पालकमंत्री ठरवतील निधीचे काय करायचे ते. आणि हो, असे इशारे वैगेरे कुणी देवू नये. ते चालणार नाही, असे अजितदादा यांनी खा. काळे यांचे नाव नं घेता सुनावून टाकले. आता परत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी काळे यांना डिवचले आहे. त्यामुळे त्यावर खासदार काळे बोलणार, हे उत्सुकतेचे ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.