महेश बोकडे
‘टाटा ट्रस्ट’कडे जबाबदारी
उपराजधानीतील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयातील १२० कोटींच्या यंत्र खरेदी प्रक्रियेतून हाफकीनला डच्चू देत ही प्रक्रिया आता टाटा ट्रस्टच्या मदतीने केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारीही सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी (पीडब्ल्यूडी) इतर खासगी यंत्रणेकडे दिली जाणार आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून कॅन्सर रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सामाजिक न्याय खात्याने २४ कोटी रुपये मेडिकलला काही महिन्यापूर्वी दिले असून हा निधी उपकरण खरेदीसाठी हाफकीनकडे वळवण्यात आला होता. दरम्यान, शासनाने गेल्यावर्षी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील उपकरणांसह औषध खरेदीची जबाबदारी हाफकीनला दिली होती, परंतु अद्याप एकही उपकरण त्यांनी खरेदी केले नाही. त्यामुळे ही जबाबदारी टाटा ट्रस्टकडे दिली जाणार आहे. यासाठी यापूर्वी हाफकीनकडे वळवलेला पैसा परत घेतला जाणार आहे.
यासंदर्भातील सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. राज गजभिये उपस्थित होते.
२०१२ मध्ये घोषणा
२०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकल रुग्णालयात कॅन्सर इन्स्टिटय़ूट उभारणीची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही संस्था औरंगाबदला वळवण्यात आली. मात्र, अशाच प्रकारची इन्स्टिटय़ूट उपराजधानीत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार कॅन्सर इन्स्टिटय़ूट मंजूर झाली, परंतु या प्रकल्पाचे अद्याप काम सुरू झाले नाही. आता शासनाने या संस्थेला प्रशासकीय मंजुरी दिली व उपकरण खरेदीसाठी पावले उचलली.
‘‘नागपुरात कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले. मुंबईत झालेल्या बैठकीत कॅन्सर रुग्णालयासाठी उपकरणांची खरेदी टाटा ट्रस्ट तर बांधकामाची जबाबदारी इतर संस्थेला देण्यावर चर्चा झाली. लवकरच त्याबाबत सूचना प्रशासनाला मिळणार आहे.’’
– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.
