बुलढाणा: बुलढाण्यातून सुरु झालेला महागाड्या व शाही ‘डिफेन्डर’ वाहनाचा वाद आता राज्यात पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डिफेन्डर वाहनावरून मोठा गौप्यस्फ़ोट केला आहे. एका मोठ्या ठेकेदाराने राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदाराना कोट्यावधी रूपये किमतीची डिफेन्डर गाडी सप्रेम भेट म्हणून दिली आहे. हा ठेकेदार कोण आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार कोण याचा उलगडा नजीकच्या काळात होणार आहे. हे सर्व आमदार कोण हे महाराष्ट्राला लवकरच कळणार असल्याचा गौप्यस्फ़ोट देखील सपकाळ यांनी केला.

राज्यात तूर्तास दिवाळीचे फटाके फुटत असून नजीकच्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमित्त राजकीय आतिषबाजी पाहवयास मिळणार आहे. या पार्श्वभूमी वर महाराष्ट्रातील सत्ताधारी २१ आमदारांना एका ठेकेदाराने महागड्या ‘डिफेंडर’ कार गिफ्ट केल्याचा आहेत, असा खळबळजनक आरोप कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

दिवाळी निमित्त आपल्या स्वगृही बुलढाणा येथे आले असता प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, हे २१ आमदार कोण? आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकर मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक ‘डिफेंडर’ कार बुलढाण्यात देखील आली असे त्यांनी आमदार संजय गायकवाड यांचा नामोल्लेख न करता सांगितले. अर्थात ती( डिफेन्डर) या २१ मधील आहे की २२ वी आहे? ते आपण सर्वांनी मिळून शोधूया असे सपकाळ मिश्किल सुरात म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा सुचक रोख कुणाकडे होता? हे उपस्थिताच्या लक्षात आले. यामुळे ”डिफेंडर” कारची स्थानिक राजकीय वर्तुळात रंगलेली खमंग चर्चा आता राज्यव्यापी झाली आहे.

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वाहनांच्या ताफ्यात मागील आठवड्यात एक आलिशान ‘डिफेन्डर ‘ कार दाखल झाली आहे. या महागड्या कारवर संजय गायकवाड यांचे विधानसभा सदस्याचे स्टीकर लावलेले तसेच गायकवाड यांचा फेवरेट असलेला वाहन नंबर ‘३१३२’ हा नव्या कारला आहे. गायकवाड यांचे कट्टर विरोधक जिल्हा भाजप अध्यक्ष तथा माजी आमदार विजय शिंदे यांनीही तीव्र आक्षेप घेऊन ही कार ठेकेदाराने भेट दिल्याचा आरोप केला होता. ऐन नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तोंडाशी गायकवाड यांना कात्रीत पकडण्याची संधी शिंदे यांनी साधली. अखेर सारवासारव करत आमदार गायकवाड यांनी ही कार एका नातेवाईक ठेकेदाराने बँकेतून कर्ज काढून प्रेमापोटी आपल्याला वापरायला दिल्याचा खुलासा केला. पण यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आयतेच कोलित मिळाले.

भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी ही चर्चा बुलढाणा शहरात व विधानसभा मतदारसंघात फिरवली. या पाठोपाठ अशातच आज (गुरुवारी) कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी २१ आमदारांना कार भेट मिळाल्याचा आरोप करून ऐन दिवाळीत स्फोटक राजकीय धुरळा उडवला आहे. आमदार गायकवाड यांच्याकडील कार ही त्या कथित २१गिफ्टमधली की स्वतंत्र २२वी? असा प्रश्न आता नव्याने उपस्थित झाला आहे. सपकाळ यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. याचे पडसाद राज्यात उमटणार असून स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत ही महागडी कार प्रचाराचा एक मुद्धा ठरण्याची दाट शक्यता आहे.