नागपूर : पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे श्वसनाशी संबंधित आजाराच्या रुग्णांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत साथीच्या आजाराचा धोका दुप्पट असतो, असे निरीक्षण क्रिम्स रुग्णालयात उपचाराला येणाऱ्या १०० पैकी वीस रुग्णांच्या अभ्यासाअंती नोंदवण्यात आले, अशी माहिती क्रिम्स रुग्णालयाचे ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.

रुग्णालयात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. येथील बाह्यरुग्ण विभागात रोज साथीच्या आजाराचे ५० रुग्ण उपचार घेतात. त्यापैकी सुमारे २० टक्के म्हणजे १० रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजाराचा धोका असल्याचे पुढे येते. त्यामुळे या रुग्णांनी या काळात जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात वातावरणात आद्रता व उष्णता दोन्ही असते. या बदलाच्या वातावरणात विविध आजारांचा धोका असतो.

हेही वाचा – बुलढाणा : “शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई तातडीने द्या,” शिवसेना आक्रमक, तहसील कार्यालयावर धडक

एका अभ्यासानुसार, पावसाळ्यात श्वसनविकार असलेल्या रुग्णांना ‘व्हायरल’ व ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’चा धोका हा अन्य ऋतूंच्या तुलनेत दुप्पट असतो. श्वसन विकारांच्या रुग्णांनी आणि विशेषतः अस्थमा व सीओपीडीच्या रुग्णांनी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, अशी माहिती डॉ. अशोक अरबट यांनी दिली. पावसाळी वातावरणात अचानक तापमानात घट झाल्याने आणि वातावरणात आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढल्याने शरीरात ‘बॅक्टेरिया’ व ‘व्हायरस’चा प्रादुर्भाव होऊन सर्दी व ताप, घशात खवखव, थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणे दिसतात. या पद्धतीचे रुग्ण सध्या नागपुरात वाढले आहेत. या वातावरणात सीओपीडी, अस्थमा विकारांच्या रुग्णांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य सहआजार असलेल्या रुग्णांनाही जास्त धोका आहे. सोबत प्रदूषके म्हणजे कणांच्या स्वरुपातील प्रदूषण वाढल्याने देखील श्वसनविकारांची जोखीम वाढली आहे. अशावेळी एकूणच वातावरण बदल आणि त्याचा समाजावर होणारा प्रभाव याचा अभ्यास करून उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचेही डॉ. अरबट यांनी सांगितले.

उपाय काय?

परागकण व धुळीपासून स्वतःचे रक्षण करावे. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे व इनहेलर्स वेळेत घ्यावेत. तंबाखूजन्य पदार्थ टाळावे, पाळीव प्राण्यांपासून अंतर ठेवावे, ते देखील अस्थमासाठी कारणीभूत ठरू शकतात. नियमित योगा व व्यायाम करण्यासह ताणतणाव कमी करण्याचा तंत्राचा सराव करणे फायद्याचे आहे.

हेही वाचा – Nagpur Farmers Protest : दिल्लीत आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक….नागपुरात थेट रेल्वेसमोर….

साथीचे आजार टाळण्यासाठी श्वसनविकार आणि रक्तदाब, मधुमेहसह इतरही सहआजार असलेल्या रुग्णांना फ्ल्यू आणि निमोकोकल विकारांच्या लसी घेऊन विकारांचा धोका कमी करता येतो. सोबत गरज असल्यास या काळात मुखपट्टी व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. – डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, क्रिम्स रुग्णालय.