नागपूर : शेजारील परराज्ये आणि अन्य मार्गाने शहरात येणारी जड वाहतूक अपघाताला कारण ठरत असल्याने वाहतूक शाखेने अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. विभागाचे उपायुक्त लोहित मतानी यांनी सोमवारी तडकाफडकी याबाबतचे परिपत्रक जारी केले. यात जिल्ह्याच्या बाहेरून शहरात येणारी वाहतूक बाह्यवळण रस्ता मार्गे परस्पर शहराबाहेरून प्रवास करतील. शहरात दूध, जीवनावश्यक वस्तू, इंधन आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त जड वाहतुकीलाही पायबंद घातला जाणार आहे.
नागपूर मार्गे जिल्ह्या बाहेर जाणाऱ्या वाहनांना बाह्य वळण रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. बरेचदा बाह्यवळण रस्ता टाळून ट्रक चालक शहरातील अंतर्गत मार्गांवरून प्रवास करतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत शहरात ४२२ अपघात झाले. यात ४५७ लोकांचा मृत्यू झाला तर २७९ गंभीर अपघातात ५६३ जण गंभीर जखमी झाले. यातील अनेकांना कायमचे अपगंत्व आले.
या कालावधीत १८० अपघातात २४७ जण लोक किरकोळ जखमी झाले. त्यामुळे, या वाहतुकीला शहरात प्रवेश बंदी लागू होणार आहे. वाहतूक शाखेने जारी परिपत्रकात विविध मार्गांनी शहराच्या दिशेने होणारी जड वाहतूक बाह्य वळण रस्त्याच्या कुठल्या मार्गाने वळवावीत याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील औद्योगिक क्षेत्रातून जड वाहतूक होणार आहे. मात्र, या वाहतुकीलाही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. जबलपूर व भंडाराकडून एमआयडीसीकडे येणारी जड वाहने कापसी उड्डाणपूल, जामठा , झिरो सर्कल अमरावती मार्गावरील गोंडखैरी टि-पॉइंन्ट येथून उजवे वळण घेवून सरळ वाडी टि-पॉइंन्ट मार्गाचा वापर करतील. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहर हद्दीत प्रवेशासाठी सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत वाहतूकीस मनाई असेल. अजनीतील भारतीय खाद्य निगम गोदाम, संत्रा मार्कट तसेच शासकीय गोदाम येथे होणारी जड वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
शासकीय वाहनांवरही नियम
शासकीय कामात गुंतलेल्या जड वाहन चालकांनी मुळ प्रमाणपत्र बाळगणे सक्तिचे असेल. वाहनावर सरकारी कर्तव्याचे फलक सक्तीची असेल.य दुध, इंधनासारख्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी जडवाहने बाह्यवळण मार्गाचाच अवलंब कतील. जडवाहनाचे मालक- चाकांना वाहतूक नियम पालन सक्तिचे असेल. शहराच्या हद्दीतून ताशी ३० कि.मी. गतीची मर्यादा बंधनकारक असणार आहे.
तर वाहन जप्ती
नागपूर शहरात माल वाहतूक करणाऱ्या जड वाहन धारकांनी दुपारी १२ ते ४ दरम्यान शहरात प्रवेश मिळावा, अशी मागणी केली आहे. शहरात मधल्या मार्गाने अनेक वाहने दाखल होतात. या बाबींचा विचारकरून प्रशासनाकडून शहरात विकासकामाचे पुरावे देणाऱ्या वाहनाला परवानगी दिली जाईल. मात्र, दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते सकाळी ६ वाजतापर्यंत याव्यतिरीक्त कोणतेही जड वाहन दिसल्यास वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे.