नागपूर : ब्रम्हपुरीचे  काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली. निवडणुकीसाठी दाखल  शपथपत्रावर आक्षेप नोंदवत त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली. वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकेवर न्या.प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

आक्षेप काय आहे?

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेतील महत्वपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे.  गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विजय नामदेवराव वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. याच मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून नारायण जांभुळे उमेदवार होते. निव़़डणुकीच्या दरम्यानही जांभुळे यांनी वडेट्टीवार यांच्या शपथपत्रावर आक्षेप नोंदविला आहे. वडेट्टीवार यांनी ज्या मुद्रांकावर शपथपत्र सादर केले, तो   त्यांच्या पत्नीने स्वतःच्या नावावर खरेदी केला आहे. वडेट्टीवार त्यावर  शपथपत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे मुद्रांक कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे. हा मुद्रांक पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला आहे. मात्र त्याचा उपयोग शपथपत्रासाठी करण्यात आला. त्यामुळे वडेट्टीवार यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

निवडणुकीत फटकारले होते

निवडणुकीच्या दरम्यान दाखल याचिकेनंतर याचिकाकर्त्याला न्यायालयाने तीव्र शब्दात फटकारले होते. भारतीय संविधानाचा उल्लेख करत न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले ती तुम्हाला कायदे माहिती नाही आहेत काय? ही याचिका नियमाप्रमाणे नाही. याचिकाकर्त्याला निवडणूक याचिका दाखल करून हा विषयावर आक्षेप नोंदविणे गरजेचे आहे. संविधानातील कलम ३२९ नुसार न्यायालय निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला निवडणूक याचिका दाखल करण्याचा सल्ला देत ही याचिका फेटाळून लावली होती. याचिकाकर्त्याने निवडणूक संपल्यावर आता याप्रकरणात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court notice to congress mla vijay wadettiwar tpd 96 amy