नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील ‘छोटा मटका’ नावाने प्रसिद्ध वाघाची प्रकृती सातत्याने ढासळत असतानाही व्यवस्थापनाकडून उपचारासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.परिणामी, या वाघाला आता चालणेही कठीण झाले आहे. समाजमाध्यमावर अलीकडेच प्रसारित झालेली त्याची चित्रफीत बघून पर्यटक देखील चिंतेत पडले आहेत. कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या या वाघाच्या उपचारासाठी वनखात्याकडून टाळाटाळ होत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील ‘छोटा मटका’ नावाने प्रसिद्ध वाघाची प्रकृती सातत्याने ढासळत असतानाही वनखात्याकडून उपचाराबाबत उपाययोजना करण्यात येत नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले हाेते. याप्रकरणाची आता स्वत: उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील दिग्गज वाघ ‘मटकासूर’ आणि वाघीण ‘छोटी तारा’ यांच्या पोटी २०१६च्या अखेरीस ‘छोटा मटका’चा जन्म झाला. ‘ताराचंद’ नावाचा त्याला एक भाऊ होता, जो वीज पडून मृत्युमुखी पडला. ‘छोटी तारा’ने त्याला वाढवले आणि तो धाडसी वाघ बनला. ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील प्रसिद्ध वाघीण ‘माया’ला देखील त्याने आव्हान दिले आणि तिच्या बछड्यांच्या रक्षणासाठी ‘मटकासूर’ने त्याला बाहेर ढकलले. २०१८ मध्ये तो बफर क्षेत्रात आला आणि निमढेला, अलिझंझा आणि नवेगाव या क्षेत्रात त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. त्याला ‘रेडिओ कॉलर’ देखील लावण्यात आली होती.

ताडाेबाच्या बफर क्षेत्रात साम्राज्य निर्माण करणाऱ्या या वाघाची बुद्धपौर्णिमेच्या दिवशी ‘ब्रह्मा’ या वाघासोबत लढाई झाली. यात ‘ब्रह्मा’ ठार झाला तर ‘छोटा मटका’ रक्तबंबाळ झाला. त्याच्या पायाला मोठ्या चिरा पडल्या आणि त्यात सातत्याने रक्त येत होते. त्याला चालणे कठीण होत असतानाही व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. ‘लोकसत्ता’मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आता पायाची जखम अधिक चिघळली असून चालणे कठीण झाले आहे. हा वाघ नैसर्गिकरित्या बरा होईल, या अपेक्षेने वनविभाग हातावर हात ठेवून बसून आहे. लोकसत्ता मध्ये प्रकाशित बातमीच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ॲड. यश सांबरे यांची न्यायालयीन मित्र म्हणून नेमणूक करीत स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दखल घेतल्यावर वाघाच्या उपचाराकडे वनविभाग लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.