वाशीम : गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्याचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण वाढवून पंधरा टक्के करावे या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने आज जिल्हाधकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने आज २८ मार्च रोजी शिवाजी चौक येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. पुढे हा मोर्चा पाटणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर: उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिमेला चपला मारणार का…? बावनकुळे यांचा सवाल

संघटनेच्यावतीने यापूर्वी देखील विविध मागण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज पुन्हा एकदा हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला. २००६ ते डिसेंबर २०१३ पर्यंत सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा. तसेच प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण ५ टक्याहून वाढवून १५ टक्के करून प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अथवा एकरकमी २० लाख रुपये मदत करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात माणिकराव गंगावणे, महादेव भरदुक, मोहन गहुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. मोर्चामुळे काहीवेळ पाटणी चौक, पोलीस स्टेशन चौक भागातील वाहतूक खोळंबली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge march of farmers at the collector office demanding 15 percent reservation to project victims pbk 85 zws