चंद्रपूर: ‘आयपीएल’ क्रिकेटवर जुगाराचा अनधिकृत व्यवसाय जिल्ह्यात खुलेआम सुरू आहे. येथील बुकी गोव्यात गेले असा बनाव सुरुवातीला करण्यात आला. मात्र, सर्व बुकी चंद्रपुरातील हॉटेलात बसून खुलेआम जुगार खेळत आहेत. बुकींचा गोवा दर्शनाचा बनाव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या बेटिंगचा म्होरक्या प्रदीप गंगमवार याच्या nice7777.fun या ‘ॲप’वर कोट्यवधींची उलाढाल होत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील व्यंकटेश हॉटेल येथे तीन बुकींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांचे भ्रमणध्वनी तपासले व विविध बँकखाते तपासले असता ३० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल दिसून आली आहे.

‘आयपीएल’ क्रिकेट मॅच सुरू झाल्यापासून जिल्ह्यात राजुरा वगळता कुठेही कारवाई झाली नाही. त्यामुळे क्रिकेट बुकींचे ‘सेटिंग’ झाले अशी चर्चा सुरू झाली आहे. बुकींपैकीच एक म्होरक्या प्रदीप गंगमवार हा सध्या हॉटेलात बसून यंत्रणा चालवत आहे. गंगमवार या बुकीच्या मागे खाकीतील अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे. त्यामुळे गंगमवार याला कोण संरक्षण देत आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. गंगमवार याने या कामात सुरुवातीला काही युवकांना गुंतवले होते. मात्र, यावर्षी शहरातील काही युवतींनाही गुंतवल्याची चर्चा आहे.

आयपीएल सुरू होण्याआधी चंद्रपुरातील व्यंकटेश हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी अविनाश हांडे, पारस उराडे, राकेश कोंडावार या तीन बुकींवर कारवाई केली. त्यांचे बँक खाते गोठवले. मात्र, प्रत्यक्ष आयपीएल सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती बुकी लागले नाहीत. अपवाद फक्त राजुऱ्याचा. सुरुवातीला बुकींना गोव्यात जाण्याचा बनाव केला. त्यांच्या मध्यस्थांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी तडजोड केली आणि ते परतले.

सध्या गल्लीबोळातील तरुणांकडे nice7777.fun ,nice45 या क्रिकेट जुगाराचा ऑनलाईन आयडी उपलब्ध आहे. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. बुकींचा टोळीचा म्होरक्या म्हणून प्रदीप गंगमवारला ओळखले जाते. त्याच्यावर आधीही सट्टा आणि जुगाराचे गुन्हे दाखल आहे. काही वर्षांपूर्वी याच गंगमावरचे नागपुरातील टोळीने पैशाच्या वादातून अपहरण केले होते. त्यानंतर हीच टोळी आणि गंगमवार यांच्यात नागपूर मार्गावरील एका हॅाटेलमध्ये राडा झाला. तीन महिने तो तुरुंणात होता. मात्र, त्याला पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा ‘आशीर्वाद’ असल्याने लवकरच त्याने पुन्हा आपले साम्राज्य उभे केले. आता आयपीएलच्या निमित्ताने तो पुन्हा सक्रिय झाला आहे.

माहिती असूनही कारवाई नाही?

बुकींच्या वर्तुळात आणि पोलिसाच्या खबऱ्यांना यासंदर्भात माहिती आहे. मात्र, अद्याप ते त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. विशेष म्हणजे, पोलीस जुगार, भंगार चोर यांच्यावर कारवाईत रमले असताना युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन जुगाराकडे अद्याप त्यांचे लक्ष गेले नाही.

वसुलीची नवी पद्धत

या धंद्यात नव्याने दाखल झालेला राजू निमजेने वसुलीची नवी पद्धत निर्माण केली आहे. पैसे न घेता तो संबंधितांना आयडी देतो. त्यानंतर त्यांच्याकडून व्याज घेतो. आधीच कंगाल झालेले सट्टेबाज मग आपली संपत्ती, सोने, वाहन निमजेकडे देऊन आपली सुटका करतात, असे सूत्रांनी सांगितले.