नागपूर : पोलीस आयुक्तांच्या बदलीला काही दिवसांचाच अवधी असताना शहरात अवैध धंदेवाल्यांचा जोर वाढला आहे. वरली-मटका आणि पत्त्याचा जुगाराचे अनेक ठिकाणी अड्डे सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही काही ठाणेदार आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहत असल्यामुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांनी जोर पकडला आहे. शहरात अनेक ठिकाणी जुगार अड्डे मोठ्या थाटात सुरु झाले तर वरली-मटका बिनधास्त सुरु झाला आहे. काही पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी अवैध धंदेवाल्यांशी मैत्री कायम ठेवली असून वाळू तस्कर, गांजा तस्कर, एमडी ड्रग्स विक्रेते पुन्हा नव्याने सक्रीय झाले आहेत.

हेही वाचा – विदर्भातील पहिले शासकीय क्लबफूट क्लिनिक ‘एम्स’मध्ये; शारीरिक व्यंग असलेल्या बालकांवर उपचार

एमआयडीसीतील जुगार अड्ड्याचा संचालक अफसर, पींटू, बबलू सोनू, रामानंद, नस्सू, केतन आणि भारत यांचे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसोबत ऊठबैस वाढली आहे. अण्णा आणि अनिल यांनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत देशी दारूची जोरात विक्री सुरु केली आहे. लकडगंजमध्ये फिरोज, पप्पू, अत्तू आणि पहेलवान यांनी नवीन ठाणेदार येताच गांजाविक्री जोरात सुरु केली आहे. सदरमध्ये गोवा कॉलनीत अद्दू, सलीम यांनी वरली आणि दारुचे अड्डे उघडले आहेत. मेडिकल चौकातील राजपूतने मोठ्या प्रमाणात मटक्याची खायवाडी सुरु केली आहे. भिवसनखोरी आणि शिलानगरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. मानकापुरात ताजनगरात गोलू तर गोधनी रोडवर तुलसी आणि यादव यांनी मोठ्या प्रमाणात वरली अड्डे सुरु केले आहेत. कामठीत इमरान, वाहिद, कल्लू हे पुन्हा सक्रीय झाले आहेत. यासोबतच लकडगंजमध्ये सडकी सुपारी आणि धान्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पोलीस आयुक्तांची होणारी बदली लक्षात घेता शहरावरील दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाणेदारांनी अवैध धंद्यांना सूट दिल्याची चर्चा आहे.

गुन्हे शाखेच्या पथकांचे अपयश

शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस ठाण्यातील डीबी पथकाप्रमाणे गुन्हे शाखेची पथकेही अवैध धंदेवाल्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेच्या पाचही पथकात जुनेच कर्मचारी अनेक दिवसांपासून असल्यामुळे कारवाई करीत नसल्याची ओरड आहे.

हेही वाचा – भाजपच्या निकटवर्तीयाला दिले २४ कोटींचे कंत्राट; कोण आहे ही व्यक्ती? माहितीच्या अधिकारातून तपशील समोर

गुन्हे शाखेच्या पथकांकडून अवैध धंद्यांवर वारंवार कारवाई करण्यात येते. कोणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही. गुन्हे शाखेची मोहीम कायम आहे. – मुमक्का सुदर्शन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा