अकोला : जिल्ह्यातील पातूर येथील जंगलात ‘पुष्पा राज’ सक्रिय झाले असून चंदनाची अवैध तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पातूर वनपरिक्षेत्रातील राखीव वनात चंदनाची अवैध वृक्षतोड करणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई चिंचखेड भाग-एक नियत क्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ६९ मध्ये करण्यात आली. शेख अफसर शेख शरीफ (वय ६५) आणि सैय्यद अली सैय्यद चांद (वय ५४), (दोघेही रा.मुजावरपुरा, पातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
चंदनाचे लाकूड हे अत्यंत मौल्यवान आणि जगप्रसिद्ध सुगंधी लाकूड आहे, जे त्याच्या टिकाऊ सुगंध आणि धार्मिक विधींमधील महत्त्वामुळे ओळखले जाते. हे जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. पातूर येथे घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंदनाची मोठ-मोठी झाडे आहेत.
या चंदनाच्या झाडांवर तस्करांची वक्रदृष्टी पडली. चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी केली जात होती. या अवैध प्रकाराची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. त्यावरून वन कर्मचाऱ्यांचे पथक चिंचखेड राखीव वनात गस्तीवर होते. जंगलाची पाहणी करीत असतांना दोन जण कुऱ्हाडीद्वारे चंदनाची झाडे तोडतांना आढळून आले. वन कर्मचाऱ्यांच्या सापळ्यात अडकणार असल्याची चाहूल लागताच आरोपींनी मुद्देमाल व हत्यारे फेकून घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला. वन विभागाच्या पथकाने आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून वन विभागाने ५.३७० किलो चंदनाचे लाकूड जप्त केले. त्यामध्ये ९६६ ग्रॅम गाभा व चार किलो ४०४ ग्रॅम सालसहित चंदनाच्या लाकडाचा समावेश आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१-अ), २६ (१) (फ) अन्वये वन गुन्हा क्रमांक १५१८/१८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वन विभागाने पुढील तपासासाठी न्यायालयाकडे तीन दिवसांची वनकोठडी मागितली. न्यायालयाने ती मंजूर केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल जे. आर. माळोदे हे करीत आहेत. ही कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक (प्रा.) सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक (वने) नम्रता ताले, पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) श्रीनिवास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जे. आर. माळोदे आणि वनरक्षक बी. व्ही. थोरात यांच्या पथकाने केली.