नागपूर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात दोषी कफ सिरपमुळे २०च्यावर मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे लहान मुलांच्या औषधांबाबत सर्वत्र काळजी व्यक्त केली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात सर्दी-खोकला झालेल्या ८० टक्के मुलांना औषधांची गरजच नसते, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य अध्यक्ष डॉ. मंजूषा गिरी यांनी व्यक्त केले.
लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. डॉ. गिरी म्हणाल्या, थोडीही सर्दी, खोकला, तापाचे लक्षण दिसल्यास पालकांच्या मनात धडकी भरते. त्यातून ते मुलाची जुनी फाईल काढून डॉक्टरांनी आधी लिहून दिलेले औषध परस्परच मुलांना देतात. काही जण जवळच्या औषध दुकानातून ते आणतात. परंतु, असे करणे चुकीचे आहे. सर्दी, खोकला, ताप साधा आहे की इतर काही कारणांमुळे तो झालाय, हे बालकाचे वय, शरीरयष्टी, लक्षणांवरून ठरवावे लागते. चुकीचे औषध दिले तर प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
८० टक्के मुलांना साधी सर्दी, खोकला, ताप हे वातावरण बदलामुळे असतात. घरात आवश्यक काळजी घेऊन औषध न देताही ही मुले बरी होतात. इतर २० टक्के मुलांना ॲलर्जिक कफ, निमोनियासह इतर काही गोष्टींमुळे त्रास असू शकतो. डॉक्टरच्या सल्ल्याने आजाराचे निदान करून कमीत-कमी औषधांत ते बरे होऊ शकतात. त्यासाठी आजाराचे अचूक निदान गरजेचे आहे. मुलांसाठी कोणते औषध सुरक्षित आहे, हे या डॉक्टरांनाच माहिती असते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यायला हवे, असेही डॉ. मंजूषा गिरी यांनी सांगितले.
ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी
ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टरांची बरीच पदे रिक्त आहेत. या भागात आवश्यक सोयी नसतात. त्यामुळे डॉक्टर रूजू व्हायला तयार होत नाहीत. शासनाने डॉक्टरांच्या समस्या सोडवत एमबीबीएस डॉक्टरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्यास तेथील बालकांच्या उपचार व्यवस्थेत सुधारणा शक्य आहे. त्यासाठी आयएमएकडूनही वेळोवेळी मदत केली जात असल्याचे डॉ. गिरी यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नये
कफ सिरप कोणत्याही औषध दुकानात सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध असतात. परंतु, ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जाऊ नये. तरच औषधांचा दुष्परिणाम थांबवणे शक्य आहे. त्यासाठी शासनासह औषध दुकानदारांनीही पुढाकार घ्यायाला हवा, असे आवाहन डॉ. गिरी यांनी केले.
अचूक मात्रेतच औषध द्या
लहान मुलांना वजनानुसार औषध किती द्यायचे हे ठरवले जाते. या औषधांचे मोजमाप प्रतिकिलो वजनानुसार ठरवले जाते. डॉक्टरांनी ठरवून दिलेले औषध अचूक मात्रेतच द्यायला हवे. त्यासाठी औषधांच्या बाटलीवरील बुचचा पावर करावा. घरातील साध्या चमच्याचा वापर केल्यास ओव्हरडोसची शक्यता वाढते, याकडेही डॉ. मंजूषा गिरी यांनी लक्ष वेधले.