अकोला : शेत जमिनीच्या हद्दीच्या खुणांचा आदेश देण्यासाठी पातूर येथील नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडे तब्बल चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणात शेतकऱ्याने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. नायब तहसीलदाराना संशय आल्याने त्याने लाच घेण्यास नकार दिला. मात्र, पडताळणी कारवाईत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने नायब तहसीलदारासह दोन आरोपींना एसीबीने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

बळीराम तुळशीराम चव्हाण (५३ वर्ष, महसूल नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, पातूर) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. पातूर तालुक्यातील उमरा येथील ३१ वर्षीय तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. शेतीच्या हद्दीची खूण कायम करून त्याचा आदेश देण्यासाठी आरोपी नायब तहसीलदाराने पडताळणी कारवाई दरम्यान पंचासमक्ष चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावेळी त्याच्या कार्यालयातील उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तक्रारदारास लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले.

सापळा कारवाईदरम्यान आरोपी नायब तहसीलदाराला संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही. भविष्यात तक्रारदारास लाच रक्कमेची मागणी करणार नाही किंवा त्याच्याकडून लाच रक्कम स्वीकारणार नाही, असे सांगितले तरी दोन्ही आरोपींविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस निरीक्षक प्रवीण वेरूळकर, अतुल इंगोले, पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, प्रदीप गावंडे, संदीप टाले, अभय बावस्कर, किशोर पवार, निलेश शेगोकार, असलम शहा, श्रीकृष्ण पळसपगार आदींच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. शासकीय कामासाठी लाच मागणीचे प्रकार वाढत चालले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यावर सापळा कारवाईत अडकलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून येते. त्यामुळे लाच मागण्याची प्रवृती वाढीस लागली आहे.