अमरावती : महापालिकेने पथविक्रेत्यांच्या विरोधात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता त्यांचे पर्यायी जागेवर पुनर्वसन करावे, या मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

काही मोर्चेकऱ्यांनी हाती खेळण्यातील बंदुका घेऊन लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. येथील इर्विन चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील छोटे व्यवसाय करणारे तसेच फेरीवाले, रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे भाजी विक्रेते आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांचाही समावेश आहे. अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना पथविक्रेत्यांच्या दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे.

गोरगरीब जनता, दिव्यांग बांधव आपली उपजीविका व्हावी, आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. मात्र, या व्यवसायाला संपूर्ण बंद करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे म्हणणे आहे. महापालिका प्रशासनाने दिलासा देणारा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील युवा स्वाभिमान पक्षाने दिला आहे.

युवा स्वाभिमान हॉकर्स युनियनचे अध्यक्ष गणेश मारोडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. काही दिवसांपुर्वी हॉकर्स युनियनच्या सदस्यांनी महापालिकेत निदर्शने केली होती. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना दोन पानांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई तात्काळ थांबवावी असे स्पष्टपणे म्हटले होते. त्याचप्रमाणे स्वाभिमान हॉकर्स युनियननेही कारवाईत जप्त केलेल्या वस्तूंचा लिलाव करू नये तर कमीत कमी दंड आकारून परत करावी, अशी मागणी हॉकर्स युनियनने केली आहे.

सोमवारी आयोजित मोर्चात शहराच्या विविध भागातील फेरीवाले, फेरीवाले आणि रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करणारे लोक सामील झाले होते. मोर्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महापालिकेची कारवाई ही अन्यायकारक असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले जात असल्याने त्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे गणेश मारोडकर यांचे म्हणणे आहे. महापालिकेने हॉकर्ससाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.