बुलढाणा : राजकीय सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखली नगरीत काल संध्याकाळी उशिरा एकाच धर्मातील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले. काही दिवसापूर्वी झालेल्या रक्तदान शिबिरावरून एकमेकांचे रक्त सांडवण्यास दोन्ही गट तयार झाले. दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी देखील झाली. घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. मात्र चिखली पोलिसांनी ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य भीषण संघर्ष टळला.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे चिखली येथील संवेदनशील बाबू लॉज चौकासह शहरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळ परिसरात रात्री तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आज गुरुवारी सकाळी देखील बाबू लॉज चौक परिसरात शांतता पूर्ण तणाव व पोलीस बंदोबस्त कायम असल्याचे वृत्त आहे.
वेगवेगळ्या रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून बुधवारी सायंकाळी उशिरा दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाली. तणाव निर्माण झाला. मात्र, वेळीच ठाणेदार संग्राम पाटील यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांची समजूत घातली. तसेच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला.
मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ईद-ए-मिलादच्या दिवशी शहरामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान केले. मात्र या शिबिरावरूनच रक्त सांडण्याची वेळ येऊन ठेपल्याचे विदारक चित्र १० सप्टेंबर रोजी रात्री पाहवयास मिळाले.
शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाबुलाज चौकामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त यंदा रक्तदान शिबिरांचे अनेक ठिकाणी आयोजन केले होते. मुस्लिम समाजातील दोन नेत्यांनी पुढाकार घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मात्र रक्तदानच्या पाच सहा दिवसानंतर १० सप्टेंबर रोजी या रक्तदान शिबिरामध्ये दुसऱ्या गटात रक्तदान का केले यावरून एका गटाच्या नेत्याने फोनवरून विचारणा केली. त्यामुळे वाद निर्माण झाला. काही क्षणातच शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बाबू लॉज चौकात दोन्ही गट समोरासमोर आले. हाणामारी झाल्याने राडा झाला. तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी शिताफीने परिस्थिती हाताळत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
परिस्थिती नियंत्रणात
दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी ‘ लोकसत्ता ‘ सोबत बोलतांना सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले.