बुलढाणा : खामगाव शहरात काही कथित गोरक्षकांनी गाय चोरीच्या संशयावरून दलित युवकास बेदम मारहाण केली. या युवकाच्या अंगावर मोकाट गायी सोडल्या आणि त्याची चित्रफीतही तयार केली. या घटनेमुळे दलित संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली असून तिसरा फरार आहे.
रोहन संतोष पैठणकर (वय २१ वर्षे, खामगाव) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटर आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, रोहन मित्रांसमवेत गप्पा मारत असताना तिथे आलेल्या दोघांनी त्याला जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात नेले व गाय चोरीचा आरोप करीत दगडाने अमानुष मारहाण केली. त्याचे कपडे फाडले, त्याच्या अंगावर मोकाट गायी सोडून त्याची चित्रफीत तयार केली. नंतर त्याला दंडेस्वामी मंदिर परिसरात नेण्यात आले. तिथे आणखी एक युवक आला. या तिघांनी रोहनला पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत त्याचा एक डोळा निकामी झाला. नाकाचे हाडही मोडले. मी गाय चोरली नाही, असे विनवणी करत असतानादेखील मारहाण करण्यात आल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे.
रोहनने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गब्बू गुजरिवाल (खामगाव), प्रशांत गोपाल संगेले ( खामगाव) आणि रोहित पगारिया (खामगाव) यांच्या विरुद्ध अॅॅट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
दलित तरुणाला ‘तुझा धर्म कोणता’ असे विचारून व तू ‘गाय चोर आहेस’ असे म्हणत मारहाण करण्यात आली. ज्यांनी हा जीवघेणा हल्ला केला ते दहशतवादी वृत्तीचे आहेत. आरोपींवर मोक्का लावण्यात यावा, कठोर कारवाई करावी. अन्यथा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. – दीपक केदार, अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना.
शिवाजीनगर पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना घटनेनंतर तत्काळ अटक करण्यात आली. मात्र तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. – प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव.