बुलढाणा : मराठा आरक्षण व लाठीमार प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मोताळा येथील आंदोलकांची प्रकृती आज तिसऱ्या दिवशी खालावली. मात्र, त्यांनी उपचार घेण्याचा प्रशासनाचा सल्ला धुडकावून अन्नत्याग सुरूच ठेवला. यामुळे आज मंडपात आलेले त्यांचे कुटुंबिय हवालदिल झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : ठरलं! यंदा मराठा क्रांती आरक्षण मोर्च्यात गगनभेदी घोषणा, ‘या’ घोषणांवर शिक्कामोर्तब

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व जालना लाठीमार प्रकरणी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी मोताळा येथे आंदोलन करण्यात येत आहे. सुनील कोल्हे, रावसाहेब देशमुख, अमोल देशमुख, शुभम घोगटे, निलेश सोनुने, ओमप्रकाश बोर्डे यांनी ८ सप्टेंबरपासून उपोषण सुरु केले आहे. आज रविवारी सहा समाज बांधवांच्या परिवाराने उपोषण मंडपाला भेट दिली. खालावलेली प्रकृती पाहून परिवारातील सदस्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. मात्र, तरीही आज अर्धांगिनी व अन्य सदस्यांनी दिवसभर उपोषण स्थळी हजर राहून उपोषणकर्त्यांना पाठबळ दिले.