बुलढाणा : जिल्हा प्रशासनाचे व जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखत ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांनी काही काळ खळबळ उडाली. भर वाहतुकीच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर गुरुवारी (३ जुलै) दुपारी हा खळबळजनक घटनाक्रम घडला. प्रदीप गोरे (४८, रा. सुंदरखेड, ता. जि. बुलढाणा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो ई रिक्षा चालक आहे.
आपल्यासह अन्य समव्यावसायिक चाळीस व्यक्तीवरील अन्यायाच्या निषेधार्थ आणि जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही न्याय मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी आज आत्मदहन करण्याचा इशारा त्याने दिला होता. यामुळे बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे साध्या वेशातील कर्मचारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात होते.
आज दुपारी प्रदीप गोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. त्याने सोबत पाण्याच्या बाटलीमध्ये पेट्रोल आणले होते. लपवून आणले पेट्रोल त्याने बाहेर काढताच साध्या वेशातील पोलिसांनी त्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पेट्रोलची बॉटल जप्त करण्यात आली. जुजबी चौकशी केल्यावर पोलिसांनी वाहनात टाकून त्याला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेले.
यासाठी उचलले टोकाचे पाऊल?
त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण देखील वेगळे आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून जनतेच्या किती अपेक्षा असतात याचा प्रत्यय देखील यावेळी आला. शहरातील मयुरी कंपनीच्या ई रिक्षामध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरी दर्जाहीन असल्याचा आरोप करत, वॉरंटी असून देखील संबंधित विक्रेत्याकडून ह्या बॅटरी बदलून दिल्या जात नाहीत, कंपनीसह अधिकृत विक्रेत्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे रिक्षा चालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात तीस ते चाळीस इ रिक्षा चालकांनी मागील १८ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून, न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र अजूनही त्यांना बॅटरी बदलून मिळत नसल्याने आज प्रदीप गोरे या रिक्षा चालकाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आत्मदहनाच्या प्रयत्नात असलेल्या विजय गोरे याला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.