चंद्रपूर : जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेसच्या सर्व संघटनांच्यावतीने खासदार प्रतिभा धानोरकर व डॉ. नामदेव किरसान यांच्या सत्कार सोहळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याकडे शहर काँग्रेस अध्यक्ष रामू उर्फ रितेश तिवारी, पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पाठ फिरवली. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील गटबाजी समोर आली आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात पूरस्थिती असताना पूरग्रस्तांच्या मदतीऐवजी खासदारांचे सत्कार सोहळे करण्यात काँग्रेस मग्न असल्याची टीका समाज माध्यमात सुरू झाली आहे. स्थानिक जिजाऊ लॉन येथे शनिवारी दुपारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते, तर आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मात्र, शहराध्यक्ष तिवारींसह बहुसंख्य पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी या सत्कार सोहळ्याला दांडी मारली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन्ही खासदारांच्या सत्काराला शहराध्यक्षच अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले. हेही वाचा : चंद्रपूर : जिल्हाधिकारी, सीईओंची भरपावसात धानशेतात रोवणी, पदाचा अभिनिवेश न बाळगता थेट चिखलात… दुसरीकडे, या सत्कार साेहळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू झाली तेव्हापासूनच जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अशावेळी पूरग्रस्तांची मदत करण्याऐवजी काँग्रेसकडून सत्कार सोहळे आयोजित केले जात आहे, अशी टीका काँग्रेसशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडूनच समाज माध्यमावर केली जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार धोटे यांना याबाबत विचारणा केली असता, कार्यक्रमाला विद्यमान शहराध्यक्ष अनुपस्थित असले तरी माजी शहराध्यक्ष उपस्थित होते, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. शहराध्यक्ष रामू तिवारी यांना विचारले असता, काकांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगितले. मात्र, शहराध्यक्षांची अनुपस्थिती खटकणारीच होती, असे काँग्रेस पक्षाशी संबंधित अनेकांचे म्हणणे आहे. विजय वडेट्टीवार आजारपणामुळे गैरहजर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या कार्यक्रमाचे उद्घाटक होते. मात्र, आजारी असल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, कार्यक्रमस्थळी वडेट्टीवार यांच्या अनुपस्थितीचीदेखील चर्चा होती. हेही वाचा : वर्धा : तिहेरी प्रेम प्रकरणातील तरुणीचाही अखेर मृत्यू, प्रेयसीच्या खोलीवर तरुणाला बघताच राग अनावर झाला आणि… राजेश अडूर उमेदवारीसाठी प्रयत्नरत जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश अडूर यांनी चंद्रपूर विधानसभा या राखीव मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. सध्या अडूर यांनी शहरातील काँग्रेसचे सर्व नेते, माजी नगरसेवक, तथा पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार, २८ जुलै रोजी शहरातील एका हॉटेलमध्ये विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी काँग्रेसच्या शहरातील सर्वच नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.