चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले. आता ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प आज (शनिवारी) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५ हजार ७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

हेही वाचा : “सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात सफारी सुरू करणार”, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांची घोषणा; म्हणाले…

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असून ही आमच्यासाठी केवळ एक फोटो फ्रेम नसून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महामार्ग आहे.’ कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसरंक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर, वनअधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : VIDEO : ताडोबा बफरचा अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’ पुन्हा एकदा मैदानात, व्हिडिओ एकदा पहाच…

त्वरित उद्यान तयार करण्याच्या सूचना

ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरित साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे, ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये ‘भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.