चंद्रपूर : ग्रामपंचायतीकडून बांधकामाची परवानगी न घेता घुग्घुस येथील लॉयड मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीने ९० गाळ्यांची निवासी वसाहत उभारण्याचे काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हातारदेवी ग्रामपंचायतीने या बांधकामाबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर कंपनीने १५ नोव्हेंबर रोजी साधे पत्र देऊन बांधकामाची परवानगी मागितली. लॉयड मेटल्सने नियम धाब्यावर बसवून सुरू केलेल्या कामामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घुग्घुस येथील लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. या कंपनीची साखरवाही मार्गावरील म्हातारदेवी येथे लॉयड ग्राम काॅलनी (निवासी वसाहत) आहे. या वसाहतीत ९० गाळे आहेत. त्यात ९० कुटुंबे वास्तव्याला आहेत. वसाहत खूप जुनी असल्यामुळे तेथील गाळ्यांचे काम सुरू आहे. कंपनीचे विस्तारीकरण लक्षात घेता वसाहतीत नवीन गाळे तसेच तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, यादृष्टीने शाळा बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : नागपूर: लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

जुने गाळे पाडून नवीन गाळ्यांमध्ये कर्मचाऱ्यांना स्थलांतरित करण्यात येणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, कंपनीने आधीच नवीन गाळ्यांचे बांधकाम सुरू केले असून निम्म्यापेक्षा अधिक काम झाले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व काम ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच सुरू आहे. यामुळे म्हातारदेवी ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत.

हेही वाचा : नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी यापूर्वीच या अवैध बांधकामाबाबतची तक्रार केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने म्हातारदेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विना परवानगीने वसाहतीचे बांधकाम केले आहे. अनधिकृत बांधकामाबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट परवानगी घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र निम्मे बांधकाम केल्यानंतर १५ नोव्हेंबर २०२३ रोजी बांधकाम परवानगीसाठी कंपनीचे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष पवन मेश्राम यांच्या स्वाक्षरीचे पत्र ग्रामपंचायतीला दिले, अशी माहिती म्हातारदेवीच्या सरपंच संध्या पाटील यांनी दिली. ग्रामस्थांनी या बांधकामाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. याबाबत लॉयड मेटल्सच्या मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष पवन मेश्राम यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur lloyds metals and energy limited started construction work without the permission of mhatardevi gram panchayat rsj 74 css