नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते मे दरम्यानच्या कालावधीत डेंग्यूचे रुग्ण चार पटींनी वाढले आहेत. यंदा जानेवारी ते मे या कालावधीत डेंग्यूच्या २३७ रुग्णांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यात १ जानेवारी ते मे २०२३ दरम्यान डेंग्यूचे १ हजार २१४ संशयित आढळले होते. त्यापैकी ६० रुग्णांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाच्या नोंदीतून समोर आली आहे. एकही मृत्यू नसल्याने मात्र आरोग्य विभागाला दिलासा मिळाला होता.

हेही वाचा – सोन्याच्या दरात नऊ तासांत तीनदा बदल.. हे आहे नवीन दर…

यंदा मात्र पूर्व विदर्भात तब्बल २३७ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दगावलेला रुग्ण वर्धा जिल्ह्यातील आहे. यंदा आतापर्यंत सर्वाधिक ८२ रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आढळले. वर्धा जिल्ह्यात ४६, गोंदिया जिल्ह्यात ३८, गडचिरोली जिल्ह्यात ३२, नागपूर ग्रामीण २७, नागपूर शहरात १२ रुग्णांची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात एकाही रुग्णांची नोंद नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या आकडेवारीला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू आजारालाच डेंगीचा ताप असेसुद्धा संबोधतात. डेंग्यूचा विषाणू म्हणजेच व्हायरस हा एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. म्हणजे डेंगू असलेल्या रुग्णाला चावलेला डास जेव्हा निरोगी व्यक्तीस चावतो तेव्हा त्या व्यक्तीलासुद्धा डेंग्यूची लागण होते. या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासांनी चावा घेतल्यानंतर डेंग्यूची लक्षणे साधारणतः पाच ते सात दिवसांमध्ये दिसू लागतात. हे डास दिवसा चवणारे असतात.

लक्षणे..

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप, डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे. या व्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात. डेंग्यूच्या गंभीर स्वरुपाच्या लक्षणात हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे व तो काळ्या विष्टेच्या स्वरुपात बाहेर पडणे, प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे, असू शकतात.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, यवतमाळच्या वणी तालुक्यातील संतापजनक घटना

डेंग्यूची स्थिती (जानेवारी ते मे)

……………………………………………

जिल्हा             २०२३ – २०२४

…………………………………………….

नागपूर (श.) १७ – १२

नागपूर (ग्रा.) ०६ – २७

भंडारा ०० – ००

गोंदिया १४ – ३८

चंद्रपूर  ०९ – ८२

गडचिरोली ११ – ३२

वर्धा ०३ – ४६