गडचिरोली: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावासाने थैमान घातले आहे. अशात भाजीपाला घेऊन गावी निघालेल्या दोन युवकांची नाव उलटली. एक पोहत बाहेर निघाला, पण दुसरा अडकला. पाण्यात वाहून जात असतानाच एक झाड आडवे आले अन् जीव भांड्यात पडला. या झाडाला पकडून त्याने एक – दोन नव्हे तब्बल ३६ तास काढले. चोहोबाजूने घनदाट जंगल, किर्रर्र अंधार अन् धो- धो वाहणारे पाणी यामुळे तो पुरता हादरलाही, पण संकटांनी घेरलेल्या स्थितीत संयम राखला. शेवटी दोर घेऊन गावातील युवक मदतीला धावले अन् ३६ तासांनी तो सुरक्षित पुरातून बाहेर आला.
अंगावर शहारे आणणारी ही आपबिती आहे भामरागडच्या गुंडेनूर येथील दलसू अडवे पोडाडी (२२) या युवकाची. ८ सप्टेंबरला गावातील विलास पुंगाटीसोबत तो लाहेरी येथे शासकीय कागदपत्रे आणण्यासाठी पायी गेला होता. त्याच दिवशी लाहेरीचा आठवडी बाजार होता. त्यामुळे त्यांनी येताना भाजीपाला खरेदी केला व पायी निघाले. मात्र, वाटेत जोरदार पाऊस सुरु झाला. अंधार होऊ लागल्याने त्यांनी लाहेरी ते बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याजवळ पडलेल्या एका टिनाच्या पत्र्याच्या नावेतून ते गुंडेनूरला पुराच्या पाण्यातून जायचे ठरवले. मात्र, काही अंतरावर पाण्याचा जोर वाढला अन् नाव उलटली. यावेळी विलास पुंगाटी पोहत बाहेर आला. मात्र, दलसू पोडाडी हा वाहत गेला. दलसू दिसेनासा झाल्यानवर विलास पुंगाटीने कसेबसे गाव गाठले व दलसू पाण्यात वाहून गेल्याची माहिती दिली. इकडे दलसू पाण्यातून वाहून जात असताना नाल्यात एक झाड आले.
हे ही वाचा…नागपूर: आरोग्य विद्यापीठाकडून डॉक्टरांना कौशल्य विकासासाठी ‘डीएचएफसी’सक्ती
या झाडाला पकडून तो बसला. तब्बल ३६ तास तो या झाडावरच मदतीची याचना करत थांबलेला होता. पाणी ओसरायचे नाव घेत नव्हते, नाल्याजवळ रस्ता नव्हता, त्यामुळे तो कोणाची मदतही घेऊ शकत नव्हता. मात्र, ३६ तासांनी त्याला शोधत गावातील युवक पोहोचले, तेव्हा तो झाडावर बसल्याचे आढळले अन् जीव भांड्यात पडला. युवक मोठ्या धाडसाने पाण्यात शिरुन त्याच्यापर्यंत पोहोचले व दोरीच्या सहाय्याने त्यास पुरातून बाहेर काढले. यावेळी दलसूच्या डोळे पाण्याने डबडबले होते.
हे ही वाचा…नागपूर हिट ॲन्ड रन: बावनकुळेंच्या वाहनाची गती आरटीओ तपासणार नाही?
गुंडेनूर नाल्यात बुडून वडिलाचा मृत्यू
पुराच्या संकटातून वाचलेल्या दलसूचे वडील अडवे पोडाडी हे काही वर्षांपूर्वी याच नाल्यात बुडून मृत्युमुखी पडले होते. दलसूचा ३६ तासांपासून शोध लागत नव्हता, त्यामुळे सुरुवातीला गावकऱ्यांचाही धीर सुटला होता, पण सुदैवाने तो सुखरुप बचावला.