गोंदिया : पोळा सण म्हणजे शेतकऱ्याला वर्षभर साथ संगत देणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करणारा सण. गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आखरावर बैलजोड्या आल्या. बैलांची मनोभावे पूजा झाली. त्यानंतर झडत्यांचा सूर शिवारात दणाणला. तोरण फुटले आणि बैल घराकडे सरसावले. एकूणच गुरूवारचा दिवस बैलांना समर्पित असाच ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोळा सण हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस. बुधवारी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात आले. गुरुवारी पोळ्याच्या दिवशी भल्या सकाळी बैलांना ओढ्यात किंवा गावाशेजारी असलेल्या तलावात नेऊन आंघोळ घातली. नंतर चरायला नेऊन घरी आणले. दुपारी 1 वाजताच्या सुमारास बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकण्यात आले. याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ म्हणतात. बैलांच्या पाठीवर छान नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा असा साज श्रृंगार करण्यात आला.

हेही वाचा : जाणून घ्या, नागपुरातील तान्हा पोळ्याचा इतिहास, स्वत: राजे रघुजी महाराज भोंसले यांनी…

या कामात सकाळपासून शेतकरी व्यस्त होते. त्यानंतर बैलाला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला. बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात आले. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. त्यानंतर बैल गावाच्या आखरावर बांधलेल्या तोरणाखाली एका रांगेत उभे केले. नंतर बैलांची पूजा करून ‘झडत्या’ रंगल्या. त्यानंतर गावातील पाटील किंवा मानवाईकांच्या हस्ते तोरण तोडून
पोळा फुटल्याचे जाहीर झाले.

हेही वाचा : शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…

पोळा फुटल्यानंतर नंतर बैल जोड्यांना मारुतीच्या देवळात नेले. पोळ्यात गेलेले बैल गावात घरोघरी जातात. घरी येणाऱ्या प्रत्येक बैलाची गृहिणींकडून पाय धुवून मनोभावे पूजा केली जाते. आणि नंतर बैलराजाला पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालते. अश्या प्रकारे बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हेही वाचा : वर्धा: बैलजोड़ी धुण्यासाठी गेले अन् पाण्यात बुडाले, पोळ्याच्या धामधुमीत बापलेकाचा मृत्यू

झडत्या :

आभाळ गड गडे, शिंग फडफडे, शिंगाला पडले नऊखडे, नऊ खड्याच्या नऊ धारा, बैल गेला पाऊन खडा, पाऊन खड्याची आणली माती, ती दिली पार्वतीच्या हाती, पार्वतीने घडवली, माझ्या बैलाची शिंगशिगोटी, एक नमन कवडा, बोला हरहर महादेव.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia traditionally celebrated bailpola by farmers with zadtya sar 75 css